Nagpur Rain Update : राज्याची उपराजधानी नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरूच आहेत. रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस दोन दिवस उलटूनही थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळे नागपुरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्याची पावसाची स्थिती लक्षात घेता नागपूर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व खाजगी व शासकीय शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
सद्यस्थितीत नागपुरात 172.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. रविवारपर्यंत सरासरीच्या तुलनेत 40 टक्क्ययांची कमतरता होती. मात्र सलग सुरू असलेल्या पावसामुळे नागपूरचा बॅकलॉग मात्र दूर झाला आहे.
गेल्या तीन दिवसांच्या संततधार पावसामुळे नागपूरच्या मानकापूर परिसरातील सदिच्छा नगरातील काही घरात संततधार पावसामुळे पाणी शिरले आहे. परिसरातील पाण्याचा निचरा करण्यासाठी असणारे चेंम्बर्स उघडून आता पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सुरु आहे.
धापेवाडा ते पाटणसावंगी राज्य मार्गावरील चंद्रभागा नदीच्या पुलावर ब्रम्हपुरी गावाजवळील तसेच कोलार नदी पुलावर पाटणसावंगी गावाजवळील दोन्ही नदीचे पुलावरून पाणी आलेला असल्याने वाहतूक बंद झालेली आहे. निरव्हा बारव्हा रस्ता बंद आहे.
नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक तालुक्यात भिवापूर 118.6, मौदा 100.3 मीमी, , रामटेक 107, काटोल 100.3, पारशिवनी 99.9, कामठी 88.8, कुही 98.2, उमरेड 80.8, नागपूर (शहर) 67.8, नागपूर (ग्रामीण) 64.7, सावनेर 65.2, कळमेश्वर 68.7, हिंगणा 57.5, काटोल 43.8, नरखेड 53.6 मीमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 148.9 मीमी म्हणजेच 48.9 टक्के पाऊस पडला आहे.