सिंगापूरमध्ये कोरोनाचे नव्याने रुग्ण आढळल्यामुळे भारतात चिंता व्यक्त केली जात आहे. 2020 मध्ये कोरोनाची लाट आली होती. ती लाट 2022 मध्ये आटोक्यात आली. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवाला लागला होता. त्यात आता पुन्हा कोरोना आल्याची जोरदार चर्चा आहे. त्यावेळी कोरोनाचा विषाणू नष्ट झालेला नव्हता. त्यामुळे तो काही भागात डोकं वर काढेल, असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले होते. त्यानुसार तो परत येवू शकतो असं आरोग्य तज्ञ अविनाश भोंडवे यांनी सांगितलं आहे. मात्र घाबरून जाण्याचे कारण नसल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे. पण कोरोना होवू नये यासाठी काय काळजी घ्याल हे मात्र त्यांनी सांगितलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोरोनाचा नवा वेरियंट समोर आला आहे असं भोंडवे यांनी सांगितलं आहे. मात्र तो पहिल्या कोरोना प्रमाणे आक्रमक किंवा घातक नाही असं ही ते म्हणाले. त्यातून जिवीत हानी होणार नाही असं ही ते म्हणाले. गेल्या चार वर्षात कोरोना संपला असं जाहीर झाल्यानंतर देखील भारतात एखादा दुसरा रुग्ण सापडत होता. त्यामुळे कोरोना परत येवू शकेल पण त्याची साथ तेवढ्या मोठ्या प्रमाणात नसेल असं ही भोंडवे यांनी स्पष्ट केलं आहे.
कोरोना चार वर्षा पूर्वी गेला असं सांगितलं जातं. पण तसं नाही. कोरोना पुर्ण पणे गेलेला नाही, असं भोंडवे यांनी सांगितलं आहे. कोरोना गेल्याचे समजून अनेकांनी टेस्ट करणे बंद केले आहे. लस देणे ही बंद झालं आहे. त्यात नवं संशोधन ही होत नाही. या सर्व गोष्टी पाहाता कोरोना परत येवू शकतो. नव्या कोरोनामध्ये लाँग कोव्हीडचा त्रास होण्याची दाट शक्यता आहे असं ही ते म्हणाले. कोरोनाचा नवा विषाणू प्राण्यांमध्ये आढळून आल्याचे ते म्हणाले.
असं असलं तरी घाबरून जाण्याची गरज नाही. नवा विषाणू तेवढासा घातक नाही. कोरोनाचा विषाणू जरी नवा असला तरी त्यावरचे उपाय हे मात्र जुनेच असल्याचं बोंडवे सांगतात. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, तोंडाला मास्क लावा, हात स्वच्छ धुवा, खोकताना तोंडावर हात ठेवा असे उपाय त्यांनी सांगितले आहे. कोरोना पुन्हा येवू शकतो. पण त्याने घाबरण्याचे काही कारण नाही. त्याची जास्त काळजी करू नका पण स्वत:ची काळजी मात्र घ्या असं त्यांनी स्पष्ट पणे सांगितलं आहे.