घरामध्ये तयार केल्या जाणाऱ्या जेवणानंतर पूर्ण भरलेल्या थाळीच्या किंमतींवर नजर टाकल्यास शाकाहारी थाळी ही गेल्या वर्षीच्या तुलनेत महागली असून मांसाहारी थाळी ही गेल्या वर्षीच्या स्वस्त झाल्याचे दिसून आले आहे. एक शाकाहारी थाळी बनविण्यासाठी येणारा खर्च 8 टक्क्यांनी वाढला असून, घरी बनणाऱ्या शाकाहारी थाळीची किंमत 27.4 रुपये इतकी झाल्याचे क्रिसिल इंटेलिजन्स अँड अॅनालिटीक्सने प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षातून दिसून आले आहे. शाकाहारी थाळीची किंमत वाढण्याचे मुख्य कारण हे कांदा, बटाटा आणि टोमॅटो यांच्या वाढलेल्या किंमती ठरले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शाकाराही थाळीची किंमत वाढली असली तरी मांसाहारी थाळीची किंमत ही गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मांसाहारी थाळीची किंमत 4 टक्क्यांनी घसरली असून आता मांसाहारी थाळीचा दर हा 56.3 रुपये असल्याचे क्रिसिल इंटेलिजन्स अँड अॅनालिटीक्सने प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षात दिसून आले आहे.
( नक्की वाचा : महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; कुटुंबांची बचत 9 लाख कोटींनी घटली )
शाकाहारी थाळीमध्ये चपाती, भाजी, डाळ, भात आणि दही यांचा समावेश असतो. मांसाहारी थाळीमध्ये बाकी सगळे पदार्थ तसेच असतात मात्र डाळीच्या ऐवजी चिकनचा समावेश असतो. गेल्या वर्षीच्या तुलनेत शाकाहारी थाळीच्या किंमतींमध्ये वाढ होण्यामागचे मुख्य कारण ठरले ते कांद्याचे दर 41 टक्क्यांनी वाढणे, टोमॅटोचे दर 30 टक्क्यांनी वाढणे आणि बटाट्याच्या किंमती 38 टक्क्यांनी वाढणे. रबीच्या हंगामात कांद्याची लागवड कमी झाल्याने बाजारात कांदा कमी आला होता, ज्यामुळे कांद्याच्या किंमती वाढल्या होत्या. पश्चिम बंगालमध्ये बटाट्याच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते, त्यामुळे बटाट्याची आवक घटली होती. तांदुळाची आवक कमी झाल्याने भात 14 टक्क्यांनी महागला आहे तर डाळींच्या किंमती वाढल्याने त्या 20 टक्क्यांनी महागल्या आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत शाकाहारी थाळी महागली असली तरी गेल्या महिन्याच्या तुलनेत शाकाहारी थाळीच्या किंमती स्थिर आहेत. मिरच्या, जिरं आणि तेलाच्या किंमतीत घसरण झाल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत शाकाहारी थाळीची किंमत स्थिर आहे. मांसाहारी थाळी स्वस्त होण्यामागे ब्रॉयलर चिकनच्या दरात झालेली घसरण हे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ब्रॉयलर चिकनचे दर 12 टक्क्यांनी घसरले आहेत. गेल्या महिन्याशी तुलना केल्यास मांसाहारी थाळीची किंमत ही 3 टक्क्यांनी वाढली आहे.