सूरज कसबे, पिंपरी-चिंचवड
पुणे-मुंबई बायपासवर पुनावळे परिसरात एका घटनेत चेंबूर येथे राहणाऱ्या 28 वर्षीय व्यावसायिक तरुणीच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. कारने दुचाकीवरील एकाच्या पायावर चाक गेल्याच्या कथित आरोपावरून तीन तरुणांनी तरुणीच्या कारचा पाठलाग करून गाडीवर दगडफेक केली. या हल्ल्यात कारच्या काचा फुटल्या आणि काचेचा एक तुकडा तरुणीच्या डाव्या डोळ्यात घुसल्याने तिला तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली आहे.
पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, 6 डिसेंबर रोजी पूजा गुप्ता आणि तिचा होणारा नवरा पुण्यातील पुनावळे येथून मुंबईकडे परतत होते. दरम्यान कात्रज–देहू रोड बायपासवरील अंडरपासजवळ ओव्हरटेक करताना त्यांच्या कारचा टायर दुचाकीवरील तिघांपैकी एका व्यक्तीच्या पायावरून गेल्याचा आरोप आहे. यावरून दुचाकीस्वारांनी तरुणीसोबत वाद घातला.
(नक्की वाचा- Pune News: पुणे-पिंपरी चिंचवडला मिळणार 7 नवीन पोलीस स्टेशन्स, तर 3 नवे झोन मंजूर)
या तिघांनी जोडप्याला शिवीगाळ करत कारच्या समोरील काचेवर दगड मारला. घाबरून हे जोडपे पुढे निघाले, मात्र ट्रॅफिक जॅममध्ये अडकले. हल्लेखोरांनी पुन्हा त्यांचा पाठलाग करून गाडीच्या इतर काचाही फोडल्या. या फुटलेल्या काचेचा तुकडा पूजा गुप्ता यांच्या डाव्या डोळ्यात घुसल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.
चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर दृष्टी वाचवण्यासाठी तातडीची कॉर्निओस्क्लेरल रिपेअर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर आठवड्याहून अधिक काळ लोटूनही गुप्ता यांची दृष्टी पूर्णपणे परत आलेली नाही. डॉक्टरांनी दुसरी शस्त्रक्रिया करावी लागू शकते, असे सांगितले आहे.
(नक्की वाचा- Viral Video: भिकारी समजून मदत करायला गेला; इन्फ्लुएन्सरसोबत विचारही केला नसेल असं घडलं)
दरम्यान या घटनेनंतर पूजा यांनी रावेत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. रावेत पोलिसांनी हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते, मात्र भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत लावलेल्या कलमांनुसार त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. गुप्ता यांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा या हल्लेखोर यांच्यावर करा अशी विनंती केली होती, मात्र पोलिसांनी तसे केले नाही. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.