Nashik News : 1 रुपया जीवावर बेतला, टपरी चालकाच्या मारहाणीत ग्राहकाचा मृत्यू

Nashik Crime News : छत्रपती संभाजी स्टेडियमजवळच्या पानटपरीवर 50 वर्षीय विशाल भालेराव यांनी सिगारेट घेतली. यावेळी पान टपरीचालक बापू सोनवणे  यांनी 11 रुपये मागितले. 

जाहिरात
Read Time: 2 mins

किशोर बेलसरे, नाशिक

Nashik News : नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनत चालली आहे. पुन्हा एकदा शहरात हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सिडकोमधील छत्रपती संभाजी स्टेडियमजवळच्या एका पान टपरीवर सिगारेट घेतल्यानंतर ग्राहक आणि टपरी चालकात वाद झाला. त्यानंतर टपरी चालकाने ग्राहकाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याने ग्राहकाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रथमदर्शनी ही खुनाची घटना असली तरी पोलिसांकडून अहवालानंतरच खून की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. बुधवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजी स्टेडियमजवळच्या पानटपरीवर 50 वर्षीय विशाल भालेराव यांनी सिगारेट घेतली. यावेळी पान टपरीचालक बापू सोनवणे  यांनी 11 रुपये मागितले. 

यावरून विशाल भालेराव याने ही सिगारेट दहाच रुपयांना मिळते, तुम्ही 1 रुपया जास्त का घेता? असा जाब विचारला. यावरुन दोघांमध्ये वाद सुरू झाला. यात भालेराव यांनी शिवीगाळ करत टपरीतील वस्तू उचलून फेकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोनवणे यांनी जवळील लाकडी दांडका भालेराव यांच्या डोक्यात मारला. तिथून स्वतःला सावरत जखमी भालेराव आपल्या कामाच्या ठिकाणी गेले. 

(ट्रेंडिंग बातमी - MNS News: 'मराठीविना काही अडत नाही', बँक कर्मचारी बोलला, मनसेने चोप-चोप चोपला)

मात्र डोक्यातून रक्तस्त्राव सुरु असल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. तेथे भालेराव यांच्या डोक्याला तीन टाके मारून डॉक्टरांनी घरी पाठवून दिले.  मात्र घरी गेल्यानंतर पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Advertisement

Topics mentioned in this article