जुई जाधव/अक्षय कुडकेलवार
महाराष्ट्राच्या कारभाऱ्यांनो, दादरच्या कबुतरखाना इथं मराठी माणसावरचा झालेला अन्याय डोळे उघडून पाहा. ते जमलं नाही तर मराठी माणसावरचा अन्याय पाहा, आणि थंड बसा. मराठी माणसाच्या महाराष्ट्रातच मराठी माणसावर कशी दडपशाही केली जाते, कसा दुजाभाव केला जातो, मराठी माणसाचा आवाज कसा बंद केला जातो, याचं हे धडधडीत उदाहरण दादरच्या कबुतरखान्यात पाहायला मिळाला. याच दादरच्या कबुतरखाना इथं ६ ऑगस्टला पहिलं आंदोलन झालं. त्या दिवशी जैन समाजानं कबुतरखान्यांवर बंदी घालण्याविरोधात आंदोलन केलं होतं. तर दुसरं आंदोलन 13 ऑगस्टला झालं. या दिवशी मराठी माणसांनी कबुतरखाने बंद करण्यासाठी आंदोलन केलं. जैनांनी आंदोलन केलं, त्यावेळी पोलीस हात बांधून बसले होते. पण मराठी माणसाच्या आंदोलनावेळी मात्र पोलिसांनी आंदोलकांना ढकलून, खेचून, ओढून पोलिसांच्या गाडीत कोंबलं. जैनांनी आंदोलन केलं त्यावेळी त्यांनी बांबू तोडले, ताडपत्र्या फाडल्या. आंदोलन करताना सुऱ्या काढल्या. हा सगळा तमाशा पोलीस शांतपणे बघत होते.
मराठी माणसानं कुठलीही हिंसा केली नाही. तरीही मराठी माणसांवर पोलिसांनी दडपशाही केली. जैनांच्या आंदोलनावेळी पोलीस मूग गिळून गप्प होते. मराठी माणसाच्या आंदोलनावेळी मराठी माणसाचा आवाज पोलिसांनी दडपला. मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख ज्यावेळी बाईट देत होते, त्यावेळी पोलीस त्यांच्या कानात सांगतात, ट्रॅफिक जाम होतंय. आता पोलिसांना ट्रॅफिक आठवलं. मग 6 ऑगस्टला जैनांनी आंदोलन केलं तेव्हा पोलिसांना ट्रॅफिक दिसला नाही का? हा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांची दुटप्पी भमिका या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जैनांच्या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. एकाही महिला पोलिसानं या आंदोलक महिलांना हात लावण्याची हिंमत केली नाही. पण मराठी माणसाच्या आंदोलनात तर पत्रकारांनासुद्धा पोलिसांनी ढकलाढकली केली. त्या दिवशी महिलांना हात का लावला नाही अशी विचारणा एनडीटीव्हीच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी विचारला. मॅडम उत्तर द्या, त्या दिवशी तुम्ही आंदोलकांना हात का लावला नाही. पोलिसांचा जैन समाजाला आणि मराठी समाजाला वेगवेगळा न्याय का. पोलिसांना हे विचारण्याची हिंमत कुणी दाखवली असेल तर ती पत्रकारांनी दाखवली.
नक्की वाचा - Dadar kabutar Khana: मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदी कायम, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय!
NDTV मराठीचे रिपोर्टर अक्षय कुडकेलवार यांनी ही पोलिसांना जाब विचारला. तेव्हा पोलिसांनी अक्षय कुडकेलवार यांनाही धक्काबुक्की केली. जैन समाजाचं आंदोलन झालं तेव्हा पोलीस कुठे होते. ही पोलिसांची दडपशाही आहे. असं अक्षय पोलिसांना सुनावत होता. जैन लोकांना ताब्यात का घेतलं नाही. तुमच्यावर मंगलप्रभात लोढांचा दबाव होता का. तेव्हा चाकू घेऊन आलेल्या महिला दिसल्या नाहीत का ? मराठी माणसावर दडपशाही कशासाठी अशी प्रश्नांची माळच अक्षय ने पोलिसां समोर लावली. याचं उत्तर एकाही पोलीस अधिकाऱ्यानं दिलं नाही.जैनांच्या आंदोलनावेळी त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला त्यादिवशी मंगलप्रभात लोढा मैदानात उतरले. आज मराठी माणसावर अन्याय होत असताना तेच लोढा म्हणाले आज मी काही बोलणार नाही. जैन आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जैनांचे नेते धावून आले. मराठी माणसाचं आंदोलन सुरू असताना मराठी नेते कुठे होते? जैनांना हातसुद्धा न लावणारे पोलीस मराठी माणसांना मात्र गुरासारखे खेचत होते. ओढत होते, पोलिसांच्या गाडीत कोंबत होते. त्यावेळी पोलिसांशी लढत होता तो मराठी माणूस आणि पत्रकार. मराठी माणसांचे कैवार घेतलेल्या एकाही पक्षाला हा राडा, हा दुट्टप्पीपणा आणि ही दडपशाही दिसली नाही का?
मराठीचं राजकारण करणारे मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या आंदोलनात का नव्हते ? मराठी माणसावरची दडपशाही पाहूनही मनसे आणि दोन्ही शिवसेनेचे नेते या आंदोलनात का सहभागी झाले नाहीत ? एरवी मराठीचा कैवार घेणारे राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे मराठी माणसावर दडपशाही होत असताना गप्प का बसले? कबूतरखान्यापासून हाकेच्या अंतरावर राहात असलेल्या राज ठाकरेंनी आणि त्यांच्या शिलेदारांनी या आंदोलनाकडे डोळेझाक का केली ? एरवी मराठीच्या मुद्द्यावर वीस वर्षांनी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून गवगवा करण्यात आला, आता मराठी माणसावर अन्याय होत असताना दोन ठाकरे बंधूंनी चकार शब्दही का काढला नाही ? फक्त राजकीय पोळीच भाजून घ्यायची तर मराठीचे झेंडे कशासाठी नाचवायचे. मराठी माणसाच्या महाराष्ट्रातच मराठी माणसावर अशी दडपशाही सुरू असताना मराठी नेत्यांनी केलेली ही डोळेझाक खरंच शोभते का? असं विचारल्या शिवाय रहात नाही.