
Mumbai News: मुंबईतील दादर येथील कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीने आंदोलनांची हाक दिली आहे. मात्र हे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली आहे. मात्र 6 ऑगस्ट रोजी जैन समुदायाच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. यामुळे पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दादरच्या कबुतरखान्यामुळे होणाऱ्या आरोग्याच्या प्रश्नांवरुन मराठी एकीकरण समितीने आंदोलन पुकारले होते. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही आवाहन करण्यात आले होते. मात्र, या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आंदोलकांची धरपकड सुरू केली. रितसर परवानगी घेऊन सुरु असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला.
(नक्की वाचा- Dadar Kabutar Khana: शस्त्र उचलण्याची भाषा कराल तर याद राखा! गोवर्धन देशमुखांचा जैन मुनींना थेट इशारा)
याउलट, 6 ऑगस्ट रोजी जेव्हा कबुतरखाना स्थलांतरित करण्याच्या पालिकेच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी जैन समुदायाने आंदोलन केले होते, तेव्हा पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. चाकू-सुरे घेऊन जमलेल्या आंदोलकांनी कबुतर खान्यावरील ताडपत्री हटवली होती, चाकून दोर कापले होते, पालिकेचे साहित्य तोडल्याचा आरोपही करण्यात आला होता. तरीही पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीने केला आहे.
पोलिसांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी 'आम्ही फक्त आमच्या आरोग्याच्या प्रश्नांवर आवाज उठवत असताना आम्हालाच का अटक केली जात आहे?' असा सवाल विचारला आहे. तसेच, 'जैन समाजाच्या आंदोलकांनी कायदा हातात घेतला असताना त्यांच्यावर कारवाई का झाली नाही?' असेही त्यांनी विचारले आहे.
(नक्की वाचा- Mumbai News : एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे एकाचा व्यासपीठावर येणार; काय आहे निमित्त?)
पत्रकारांनी देखील पोलिसांना याबाबत प्रश्न विचारण्याचे प्रयत्न केले. मात्र पोलिसांना या प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही बांधिल नाहीत असं उलट उत्तर दिलं. वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना देखील पोलिसांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र जैन समाजासाठी पायघड्या घालणाऱ्या पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच आंदोलन चिरडलं. त्यामुळे या आंदोलनाबाबत पोलिसांना नक्की काय आदेश होते आणि कुणाचे आदेश होते, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world