Devabhau Taxi Service: मुंबई आणि उपनगरात रोज लाखो लोक प्रवास करतात, पण ओला आणि उबर सारख्या कंपन्यांच्या मनमानी भाड्यामुळे प्रवाशांचे खिसे रिकामे होत आहेत. दुसरीकडे, या खासगी कंपन्यांच्या भरमसाठ कमिशनमुळे टॅक्सी चालक आणि मालक देखील कर्जाच्या विळख्यात अडकत चालले आहेत. या दोन्ही मोठ्या समस्यांवर आता राज्य सरकारने एक मोठा तोडगा काढला आहे.
मुंबईकरांचा प्रवास अधिक स्वस्त आणि सुकर करण्यासाठी सरकार ओला-उबरला टक्कर देणारी एक नवीन सरकारी टॅक्सी सेवा सुरू करत आहे. यामुळे प्रवाशांचे पैसे तर वाचतीलच, पण चालकांनाही थेट मोठा आर्थिक फायदा होणार आहे.
मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात राहणाऱ्या प्रवाशांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. दिल्ली आणि कोलकाता या शहरांच्या धर्तीवर आता मुंबईतही स्वस्तात मस्त अशी देवाभाऊ सहकारी टॅक्सी आणि छावा टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे. भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या संकल्पनेतून ही योजना प्रत्यक्षात येत आहे.
या नवीन सरकारी टॅक्सी सेवेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकृत बैठक घेऊन हिरवा कंदील दिला आहे. या योजनेचे नेमके स्वरूप काय असेल आणि याचा मुंबईकरांना कसा फायदा होईल, याची सविस्तर माहिती समोर आली आहे.
( नक्की वाचा : Mumbai News : रिक्षा आणि टॅक्सी तक्रारीसाठी परिवहन विभागानं सुरु केला टोल फ्री क्रमांक, हा नंबर करा सेव्ह! )
खासगी कंपन्यांच्या कमिशनगिरीला बसणार आळा
सध्या मुंबई आणि संपूर्ण एमएमआर क्षेत्रात ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या खासगी टॅक्सी कंपन्यांचे जाळे पसरले आहे. मात्र, या कंपन्या टॅक्सी चालकांकडून मोठ्या प्रमाणात कमिशन घेतात, ज्यामुळे चालकांच्या हातात अत्यंत कमी पैसे उरतात. प्रवाशांनाही अनेकदा जादा भाडे मोजावे लागते.
दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकारनं अशाच प्रकारे भारत टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. हा प्रयोग दिल्लीत चांगलाच यशस्वी झाला आहे. आता त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देवाभाऊ आणि छावा टॅक्सीचे स्वतःचे अधिकृत मोबाईल अॅप आणले जाणार आहे. या सरकारी अॅपमुळे खासगी कंपन्यांची मनमानी आणि कमिशनगिरी पूर्णपणे बंद होणार आहे.
( नक्की वाचा : Titan Story: टायटनची घड्याळे इतर ब्रँड्सच्या तुलनेत महाग का असतात? वेब सीरिजच्या चर्चेत समजून घ्या नेमके कारण )
कुणाला मिळणार रोजगार?
या नवीन टॅक्सी सेवेचे धोरण निश्चित करण्याची आणि त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांनी या योजनेचा संपूर्ण आराखडा तयार केला आहे.
या योजनेमुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि संपूर्ण एमएमआर रिजनमधील टॅक्सी चालकांना स्वतःचा हक्काचा रोजगार मिळणार आहे. कंपन्यांना कमिशन देण्याची गरज नसल्यामुळे चालकांचे उत्पन्न वाढेल आणि स्पर्धा निर्माण झाल्यामुळे मुंबईकरांनाही अत्यंत परवडणाऱ्या दरात, म्हणजेच सध्याच्या दरांपेक्षा कमी पैशात प्रवास करता येणार आहे.
पहिल्या टप्प्यात 2 ते 5 हजार वाहने रस्त्यावर उतरणार
मुंबै बँकेचे अध्यक्ष आणि भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ही सेवा सुरू झाल्यावर पहिल्या टप्प्यात सुमारे 2000 ते 5000 वाहने संपूर्ण एमएमआर रिजनमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. टॅक्सी चालकांमध्ये या योजनेबाबत प्रचंड उत्साह असून, लवकरच मुंबईकरांना या डिजिटल आणि स्वस्त प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.