गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी
कोकणातील प्रसिद्ध देवगड आंब्याच्या बोगस विक्रीला पायबंद घालण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. सर्रासपणे देवगड आंब्याच्या नावाखाली कोणताही आंबा ग्राहकांना दिला जात असल्याचं दिसून येत असल्याने देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने हा निर्णय घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली बोगस विक्रीला पायबंद घालण्यासाठी शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने आता प्रत्येक देवगड हापूस आंब्याला युनिक कोडचा (UID) देण्याचा निर्णय देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने घेतला आहे. या संदर्भात आयोजित चर्चासत्रात मोठ्या संख्येने आंबा बागायतदार व विक्रेते उपस्थित होते. सर्वांनीच या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता देवगड हापूसच्या प्रत्येक आंब्यावर युनिक कोड असणं बंधनकारक करण्यात येणार आहे.
नक्की वाचा - GST Notice: अबब! पाणीपुरीवाल्याच्या कमाईचे आकडे पाहून डोळे फिरले, आयकर विभागाकडून थेट GST नोटीस
युनिक कोडचे पेटंट मिळालेल्या मुंबई येथील सन सोल्यूशन या कंपनीबरोबर संस्थेने करार केला आहे. त्यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली होणाऱ्या बोगस आंबा विक्रीला पायबंद घालण्यात मोठा हातभार लागणार आहे. हे युनिक कोड संस्थेच्या मार्फत वितरित केले जाणार आहेत. अशा युनिक कोडचा बोगस वापर होऊ नये, त्याकरता शेतकऱ्यांना त्यांची देवगड तालुक्यातील आंबा कलमे, 7/12 चा उतारा तपासून आणि त्यांची उत्पादन क्षमता बघून तितकेच कोड मिळणार आहेत. असे कोड मिळण्याकरता प्रत्येक शेतकरी जीआय धारक असायला हवा. 10 जानेवारी 2025 च्या आत शेतकऱ्यांनी संस्थेकडे संपर्क साधून नोंदणी करावी आणि कोडची ऑर्डर नोंदवावी असे आवाहन देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष अजित गोगटे यांनी केले आहे. ग्राहकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून साध्या सोप्या पद्धतीने आंब्याची तपासणी करता येणार आहे. ग्राहक 919167668899 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.