Ajit Pawar's plane malfunctioned : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठी बातमी समोर आली आहे. DGCA कडून VSRचं लिअरजेट ४५ विमानाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला असून यामधून धक्कादायक बाब समोर आली आहे. अजित पवार ज्या विमानातून प्रवास करीत होते त्या लिअरजेट विमानात त्रुटी असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यानंतर लिअरजेट ४५ विमानाने एअर सेफ्टीचं पालन केलं नसल्याचं यामध्ये म्हटलं आहे. परिणामी लिअरजेट विमानांची उड्डाणं थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२८ जानेवारी रोजी अजित पवार VSRचं लिअरजेट ४५ विमानाने प्रवास करीत होते. या विमानाचं बारामतीत लँड करताना अपघात झाला. यामध्ये अजित पवारांसह सहा जणांचा मृत्यू झाला. यानंतर DGCA ने विमानाची सुरक्षा तपासणी करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान VSRचं लिअरजेट ४५ विमानाच्या तपासणी अहवालात विमानात त्रुटी असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय विमानाने सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.
लेअर जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी
DGCA च्या अहवालानुसार, विमानाच्या एअरवर्दीनेस म्हणजे उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं उल्लंघन झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष या अहवालातून देण्यात आला आहे. विमान प्रवासादरम्यान आवश्यक असलेल्या विमान सुरक्षा नियमांचं पालन केलं नाही. निष्कर्षाच्या आधारे व्हीएसआर कंपनीची चार लेअर जेट विमानांच्या उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं पालन केल्याशिवाय व्हीएसआर कंपनीच्या मालकीच्या VT-VRA, VT-VRS, VT-VRV, VT-TRI या चार विमानांची उड्डाणं करू नयेत असं या अहवालात म्हटलं आहे. उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या अनेक मानकांचं आणि प्रक्रियांचं पालन का केलं नाही याबाबतची कारणमीमांसा करणारा अहवाल सादर करण्याचे व्हीएसआर कंपनीला DGCA कडून आदेश देण्यात आले आहेत.
अहवालात नेमकं काय म्हटलंय?
- VSRचं लिअरजेट 45 विमानाने नियम प्रक्रियांचे उल्लंघन केलं
- गैर-अनुपालन आणि देखभाल प्रक्रियांमधील तफावत आढळली
- तत्काळ सुधारात्मक उपाय सुरू करण्याच्या दृष्टीने उड्डाणं थांबवा
- जोपर्यंत उड्डाणासाठी योग्य होत नाही तोवर उड्डाणं थांबवा