सरपंच संतोष देशमुख यांची हाल हाल करुन हत्या करण्यात आल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर राजीनामा न देण्यावर ठाम असलेल्या धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिल्याचं एक कारण धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. राजीनामा दिल्यानंतर ट्वीट करत धनंजय मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
धनंजय मुंडे यांचं ट्वीट
धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत म्हटलं की, "बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले."
(नक्की वाचा- संतोष देशमुखांच्या हत्येचे अंगावर काटा आणणारे फोटो आले समोर, मन होईल सून्न)
(नक्की वाचा- Dhananjay Munde resignation : धनंजय मुंडेंना दणका; CM फडणवीसांचे राजीनामा देण्याचे आदेश?)
"या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे", असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांचं ट्वीट म्हणजे निर्लज्जपणाचा कळस- दमानिया
धनंजय मुंडे यांचं ट्वीट म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असल्याची प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे. वैद्यकीय कारण देणारे धनंजय मुंडे काल विधिमंडळात फेरफटका मारायला गेलेले होते का? काल ठणठणीत दिसत होतात. विधिमंडळात अनेकांच्या भेटीगाठी देखील घेतल्या. मग तुम्हाला एका रात्रीत डॉक्टरांनी सल्ला दिला काय. तुम्हाला लाज नाही. म्हणून मी म्हणत होते धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही त्यांची हकालपट्टी करायला हवी होती, अशी संतप्त प्रतिक्रिया अंजली दमानिया दिली आहे.