पावसाळा सुरू होताच संसर्गजन्य आजार डोकं वर काढतात. मुंबईत लहान घरं, ठिकठिकाणी पावसाळ्यात पाणी साचणे, रस्त्यांवर घाण जमा होणे त्यातून आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. धारावीमध्ये औषधांना ही न जुमानणारा क्षयरोग, मलेरिया, डेंग्यू आणि अतिसार हे आजार सामान्यतः मोठ्या प्रमाणावर आढळतात, हे सर्वश्रुत आहे. मात्र प्रत्येक पावसाळ्यात विशेषतः जुलै ते सप्टेंबर दरम्यान एक जीवघेणा संसर्ग झपाट्याने पसरतो आणि अनेकांच्या जीवाला धोका निर्माण करतो.
हा संसर्ग म्हणजेच लेप्टोस्पायरोसिस एक जीवाणूजन्य आजार, जो प्रामुख्याने उंदरांसारख्या संक्रमित प्राण्यांच्या मूत्रामुळे दूषित झालेल्या पाण्यातून पसरतो. पावसाळ्यात अशा पाण्यातून चालताना, विशेषतः पायाला लहानसुद्धा जखम असणाऱ्यांना, या संसर्गाचा धोका जास्त असतो विशेषतः जर ते चपला किंवा बूट न घालता चालत असतील, तर.
धारावीत अनेक वर्षे वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स सांगतात की, जुलै ते सप्टेंबर या काळात दर महिन्याला सरासरी 20 ते 30 लेप्टोचे रुग्ण समोर येतात. सर्व वयोगटांतील लोकांना हा आजार होऊ शकतो; मात्र लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना त्याचा धोका अधिक असतो. वरील परिस्थिती पाहता पुनर्विकास हा धारावीतील नागरिकांसाठी एकमेव पर्याय शिल्लक राहिल्याचं दिसून येत आहे.
नक्की वाचा - Mumbai Rain : ...अन् BEST ची बस गेली 5 फूट खड्ड्यात; मुंबईकरांचं टेन्शन वाढलं!
आकडेवारी काय सांगते?
- महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण 2024-25 नुसार, लेप्टोस्पायरोसिसमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 225% वाढ नोंदवण्यात आली आहे आणि मुंबई हे या साथीचे केंद्रबिंदू ठरले आहे.
- 2024 मध्ये राज्यात लेप्टोमुळे 26 मृत्यू झाले,
- 2023 मध्ये हे प्रमाण केवळ 8 होते.
- एकट्या मुंबईत 18 मृत्यू ऑक्टोबर 2024 पर्यंत नोंदवले गेले,
- 953 रुग्णांची नोंद झाली, विशेषतः धारावी, कुर्ला आणि गोवंडी परिसरांमधून.
- 2018 मध्ये धारावीतील 17 वर्षीय मुलगा लेप्टोमुळे सायन रुग्णालयात मृत्यूमुखी पडला होता, ही घटना आजही लोकांच्या स्मरणात आहे.
नक्की वाचा - Education City: नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटीची उभारणी, 5 विदेशी विद्यापीठांना देणार इरादापत्र
धारावी असुरक्षित...
हुसैनी मशीदजवळील धारावी पोलीस ठाण्याच्या मागील गल्लीत राहणाऱ्या अमिना बानू शेख सांगतात, "माझ्या झोपडीबाहेर गेली अनेक वर्षे गटार वाहतंय. तिथे उंदीरच उंदीर आहेत. माझी मुलं दिवसभर त्याच जागी खेळतात. त्यांच्याकडे शाळेसाठी फक्त एक जोडी बूट आहे; बाकी वेळ ते अनवाणीच राहतात. माझ्या 11 वर्षांच्या मुलीला गेल्या वर्षी लेप्टो झाला होता. यावर्षीही तसेच होईल, अशी मला भीती वाटते.”
धारावीतील ब्लॉक क्र. 5 चे रहिवासी अनिस उपहासात्मक सुरात म्हणाले, "धारावीची स्थिती अशी आहे की, इथल्या गल्लींत मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टो – काय हवं ते मिळेल! मुलं आजारी पडतात, त्यांना सायन रुग्णालयात नेलं जातं, आणि तिथेच त्यांचा अंत होतो.”
डॉ. अनिल पाचनेकर, जे 1985 पासून धारावीत वैद्यकीय सेवा देत आहेत. ते याबाबत म्हणाले, "धारावीत लेप्टोचा प्रश्न अधिक गंभीर आहे, कारण पाणी व ड्रेनेज व्यवस्थेचा अभाव आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचतं, नाले तुंबतात, आणि त्याच पाण्यात उंदीर, मांजरं आणि इतर प्राणी मूत्र विसर्जन करतात. त्या मूत्रात असलेल्या जीवाणूंमुळे जखमीतून संसर्ग होतो." डॉ. पाचनेकर हे भारतीय वैद्यकीय संघटनेचे माजी अध्यक्ष देखील आहेत.
डॉ. अमजद बाग, जे 90 फूट रस्त्यावर दवाखाना चालवतात. ते यासंदर्भात म्हणतात, "धारावीत पावसाळ्यात होणाऱ्या आजारांची ही दु:खद कहाणी वर्षानुवर्षं तशीच सुरू आहे. इथली परिस्थिती अशी आहे की लोकांना आजारांपासून वाचणं शक्यच नाही. मुलं अस्वच्छ रस्त्यांवर खेळतात, लोकांना कामावर जाण्यासाठी पाण्यातूनच जावं लागतं. प्रत्येकाकडे चप्पल, बूट असतीलच असं नाही. इतक्या वर्षांत काहीही बदल झालेला नाही."
धारावीमध्ये लेप्टोस्पायरोसिस ही केवळ वैद्यकीय नव्हे तर सामाजिक, नागरी आणि धोरणात्मक व्यवस्थेच्या अपयशाची भयावह झलक आहे. धारावीतील नागरिकांचे जीवन आणि आरोग्य हे धोका पत्करूनच चालले आहे. पावसाळा येतो तसा आजारांचाही कहर वाढतो आणि दुर्लक्षित गल्ल्यांतील ही लोकं पुन्हा एकदा भीती, वेदना आणि संकटात सापडतात.