Dharavi Skill Development Program: धारावीतील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने कौशल्यप्रशिक्षणाचा 'नवा अध्याय' धारावीत सुरू झाला आहे. सिम्बायोसिस मुक्त शिक्षण सोसायटी आणि नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (एनएमडीपीएल) यांच्या भागीदारीतून सुरू करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमामुळे धारावीतील पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना कौशल्यप्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
कौशल्य प्रशिक्षणावर स्वतंत्रपणे भर देणारे 'सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यवसाय विद्यापीठ' (एसएसपीयू) हे देशातले पहिले विद्यापीठ आहे. या विद्यापीठाच्या वतीने धारावीतील पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारकांसाठी 4 महिने कालावधीचा विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमामध्ये बीएफएसआय, रिटेल, लॉजिस्टिक, हेल्थकेअर, समुपदेशन आणि उत्पादन अशा मागणी असलेल्या विविध क्षेत्रांचा सामवेश करण्यात आला आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना फायनान्शियल ॲनालिस्ट, बिझनेस ॲनालिस्ट, एचआर एक्झिक्युटिव्ह, लॉजिस्टिक कोऑर्डिनेटर अशा नोकऱ्यांसाठी तयार केले जाईल. मे महिन्यात सिम्बायोसिस आणि एनएमडीपीएल यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारातून या कौशल्यप्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उद्योग जगतात सिम्बायोसिसच्या असलेल्या ख्यातीमुळे हा कौशल्यप्रशिक्षण अभ्यासक्रम खास ठरणार आहे. उद्योगक्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन, प्रत्यक्षातील उदाहरणे, बायोडेटा कार्यशाळा आणि प्रत्यक्ष मुलाखतींचा सराव यांचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. "एनएमडीपीएलसोबत आम्ही सुरू केलेला हा प्रवास म्हणजे धारावीतील तरुणांच्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. धारावीतील तरुणांना उद्योगाभिमुख कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा आमचा मानस आहे" अशा शब्दांत सिम्बायोसिसचे बिझनेस ऑपरेशन्स डायरेक्टर राजेश खन्ना यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
वास्तविक, या उपक्रमांतर्गत, फायनान्शियल ॲनालिस्ट अभ्यासक्रमाच्या दोन तुकड्या एनएमडीपीएलच्या 'धारावी रिसोर्स सेंटर' येथे सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण 46 विद्यार्थी असून विशेष म्हणजे विद्यार्थिनींचे प्रमाण 60% हून अधिक आहे.
"रेग्रेशन ॲनालिसिस, टाईम व्हॅल्यू ऑफ मनी अशा अनेक संकल्पना या अभ्यासक्रमात मला समजून घेता आल्या. भविष्यात याचा नक्कीच उपयोग होईल" अशी प्रतिक्रिया प्रशिक्षणार्थी अयान सिद्दिकी याने दिली. इन्शुरन्स अँड प्रेझेंटेशन स्किल्स याबाबतच्या सत्रांमधून अनेक प्राथमिक संकल्पना डोक्यात स्पष्ट झाल्याचे सांगत सायली घोक्षे आणि दिया वाडेकर यांनी अभ्यासक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.
या उपक्रमात अभ्यासक्रमासह प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले अनुभवी प्रशिक्षक, लर्निंग लॅब्स अशा पायाभूत सुविधाही सिम्बायोसिस कडून पुरवण्यात येत आहेत. तसेच प्रत्यक्ष नोकरीसाठी मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे.
कौशल्य प्रशिक्षणाची ही चळवळ धारावीतील प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी एनएमडीपीएल प्रयत्नशील आहे. यासाठी धारावी रिसोर्स सेंटरच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत आहे. "हा केवळ तात्पुरता उपक्रम नसून सिम्बायोसिसच्या जी सी सी एम्प्लॉयबिलिटी अँड स्किलिंग प्रोग्राम (GESP) अंतर्गत उचललेलं महत्वपूर्ण पाऊल आहे. धारावीसारख्या वस्तीतल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांमध्ये रोजगार मिळवून देण्याच्या आमच्या व्हिजनचा हा एक भाग आहे" अशी प्रतिक्रिया एनएमडीपीएलच्या प्रवक्त्याने दिली.
यापुढील टप्प्यात, ग्लोबल बँकिंग आणि बिझनेस ॲनालिस्ट याविषयी अभ्यासक्रम सुरू केला जाणार असून काही महत्त्वाची उद्दिष्ट्ये समोर ठेवली जाणार आहेत. या अभ्यासक्रमामध्ये 60% विद्यार्थिनींचा समावेश, 75% उपस्थिती अनिवार्य, किमान 70% प्रशिक्षणार्थींना थेट नोकरी याची पूर्तता कटाक्षाने केली जाईल.दर्जेदार प्रशिक्षण, उद्योगाभिमुख कौशल्यविकास आणि स्थानिकांचा सकारात्मक प्रतिसाद या त्रिसूत्रीवर उभारलेले सिम्बायोसिस - एनएमडीलीएलचे हे मॉडेल कौशल्यविकासाचा नवा अध्याय ठरेल, यात शंका नाही.