धारावीकरांना मोठ्या प्रमाणात कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने, धारावी सोशल मिशनच्या (डीएसएम) वतीने धारावीत पहिल्यांदाच 'संसाधन केंद्रा'चं लोकार्पण बुधवारी करण्यात येणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि कौशल्य विकास या विविध पातळ्यांवर एकत्रित प्रयत्न केले जाणार असून धारावीकरांच्या आयुष्याला सकारात्मक कलाटणी देणाऱ्या प्रवासाची ही पहिली पायरी ठरेल, असा विश्वास डीएसएमच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. या उपक्रमातून धारावीकरांचे दैनंदिन जीवन सुकर करतानाच उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संकल्प देखील डीएसएमच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'मिनी इंडिया' म्हणून ओळखला जाणाऱ्या धारावीतील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मेहनतीने आणि जिद्दीने ध्येय गाठण्यासाठी झटणाऱ्या युवकांची अनेक उदाहरणे आहेत. संसाधन केंद्राच्या माध्यमातून अशा तरुणांना सहजतेने मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच या केंद्राच्या माध्यमातून धारावीकरांशी असलेले ऋणानुबंध आणखी दृढ करण्याचा डीएसएमचा मानस आहे.
धारावीतील रहिवाशांसोबत जवळून काम करण्याची संधी देणारं हे संसाधन केंद्र अखेर सुरू होतंय, ही आमच्यासाठी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. वास्तविक, गेल्या वर्षापासूनच डीएसएमच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांमधून आम्हाला विविध वयोगटातील धारावीकरांशी संपर्क साधता आला. यातून आम्हाला धारावीची संस्कृती, इथल्या रहिवाशांच्या आशा-आकांक्षा यांची माहिती मिळाली असून धारावीतील युवकांमध्ये खूप मोठी क्षमता दडलेली असल्याचं आमचं मत आहे. धारावीच्या युवकांची प्रतिभा ओळखणे, त्यांच्या कौशल्याला योग्य ती दिशा देणे, त्यांचे ज्ञान वृद्धिंगत करणे, तसेच रहिवाशांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपतानाच उत्तम दर्जाचे वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य जगण्यासाठी प्रयत्न करणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे" अशा शब्दांत डीएसएमच्या प्रवक्त्याने आपली प्रतिक्रिया दिली.
नक्की वाचा - Dharavi Social Mission: धारावी सोशल मिशनचा स्तुत्य उपक्रम: ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकविकास शिबिराचे आयोजन
धारावी सोशल मिशनची स्थापना जून 2024 मध्ये झाली असून तेव्हापासून आजपर्यंत विविध उपक्रमांचे आयोजन डीएसएमच्या वतीने करण्यात आले आहे. धारावीकरांशी आपली नाळ घट्ट करत त्यांच्या उज्वल आणि आत्मसन्मानपूर्ण भविष्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिज्ञा नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड ( पूर्वीचे डीआरपीपीएल) यांनी केली होती. संशोधन केंद्र हे या कटिबद्धतेची प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीने सुरू झालेली वाटचाल आहे.
वास्तविक डीएसएमने विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करून याआधीच धारावीकरांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. धारावीतील लघुउद्योग आणि बचत गटांच्या समोरील आव्हाने जाणून घेण्यासाठी डीएसएमच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांमधून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि थेट बाजारपेठेशी जोडून लघु उद्योजक आणि स्वयं सहाय्यता गटांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. 'युवा संवाद' कार्यक्रमात 180 हून अधिक युवकांनी सहभाग घेऊन नवनव्या संधी शोधण्यासाठी धारावीतील आपल्या सहकाऱ्यांना प्रेरित केले. अशा कार्यक्रमांमधूनच धारावीकरांशी आमची नाळ जोडली गेली आणि त्यांच्यासाठी आणखी उपक्रम राबविण्याची प्रेरणा आम्हाला मिळाली, असेही डीएसएमच्या प्रवक्त्याने सांगितले.
सुमारे 12 लाख लोकांना आश्रय देणाऱ्या धारावीत कोणताही उपक्रम हा पुरेसा पडणार नाही. पण तरीही, उज्वल भविष्यासाठी सर्वांना समान संधी देण्याच्या हेतूने कुठूनतरी सुरुवात करणे आवश्यक आहे. डीएसएमची यशस्वी वाटचाल ही आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. "लोक विकास उपक्रमातून धारावीतील ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांना सुमारे 10 कोटी रुपयांच्या मोफत शासकीय आरोग्य सुविधांचा फायदा करून देण्यात आला. रोजगार मेळाव्यातून अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या, तर सुमारे 200 रहिवाशांना विविध प्रकारच्या 177 शासकीय योजनांमधून थेट फायदा मिळाला. सुमारे 200 धारावीकरांना विविध प्रकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमांमध्ये सहभागी करून त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच सुमारे 200 रहिवाशांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला" अशी माहिती धारावी सोशल मिशनच्या प्रवक्त्याने दिली.
धारावीकरांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी संसाधन केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार असून डीएसएमच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये जास्तीत जास्त धारावीकरांना सामावून घेतले जाणार आहे. धारावीकरांच्या आशा - आकांक्षा समजून घेऊन उज्वल भविष्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आमचे लक्ष्य असून, 2025 मध्ये सुमारे 10,000 कौशल्य विकासाच्या संधी, 3000 तरुणांना रोजगाराच्या संधी आणि आयुष्यमान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या दुपटीवर नेण्याचा आमचा मानस आहे " असेही डीएसएमच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.