Dombivli Crime News : रुग्णाला उपचारादरम्यान आधार देण्याच्या नावाखाली डोंबिवलीमध्ये एका प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ (Orthopedic) डॉक्टराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मयूरेश वारके असं या प्रकरणातील डॉक्टरचे नाव आहे. ते अंबरनाथमधील एक प्रतिष्ठित डॉक्टर मानले जातात. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच डॉक्टर फरार झाले असून, मानपाडा पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण?
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीला गँग्रीन झाले होते. उपचारासाठी त्याने अंबरनाथ येथील डॉक्टर मयूरेश वारके यांच्याशी संपर्क साधला. डॉ. वारके यांनी त्या रुग्णावर उपचार सुरू केले, याच दरम्यान त्यांची रुग्णाच्या पत्नीसोबत ओळख झाली.
उपचारादरम्यान रुग्णाचे पाय कापावे लागले, मात्र दुर्दैवाने काही दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर पत्नीला मोठा मानसिक आधार हवा होता. डॉ. वारके यांनी याच संधीचा फायदा घेतला. डॉक्टरांचे कुटुंब परदेशात राहत असल्याने त्यांनी या महिलेला "मी तुझ्याशी लग्न करेन आणि तू आता कोणतीही काळजी करू नकोस," असे आमिष दाखवले.लग्नाचे आमिष दाखवून डॉ. वारके यांनी सातत्याने या महिलेवर बलात्कार केला.
( नक्की वाचा : पती-पत्नी आणि 'ती'च्या वादामुळे एका आईचा जीव गेला! 14 वर्षांचा मुलगा पोरका; अकोल्यात खळबळ )
महिलेची पोलिसांत धाव
डॉक्टर वारके आपल्याला फसवत आहेत, हे काही दिवसांनंतर महिलेच्या लक्षात आले. यानंतर तिने तातडीने मानपाडा पोलीस ठाणे गाठले आणि डॉ. वारके यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पीडित महिलेच्या तक्रारीच्या आधारावर मानपाडा पोलिसांनी डॉ. वारके यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
( नक्की वाचा : Dombivli News : 'सुसंस्कृत' डोंबिवलीला कुणाचा कलंक? आमदाराच्या भावावर रात्री पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ! )
गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच डॉक्टर मयूरेश वारके हे पसार झाले आहेत. अंबरनाथमधील एका नामांकित डॉक्टराने रुग्णाच्या पत्नीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याने या घटनेमुळे डॉक्टरकीच्या पेशाला काळीमा फासला गेला आहे. मानपाडा पोलीस सध्या या फरार डॉक्टराचा कसून शोध घेत आहेत.