Dombivli Traffic Issue : डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीचा त्रास नेहमीच सहन करावा लागतो. अरुंद रस्ते, रस्त्यावर खड्डे, सतत वाढती लोकसंख्या आणि त्याच प्रमाणात वाढत असलेली वाहनं यामुळे डोंबिवलीकरांना अनेकदा वाहतूक कोंडी सहन करावी लागते.
डोंबिवलीहून नवी मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावर शिळ फाट्याजवळ वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून सुटलेला नाही. या भागातून रोज लाखो वाहनं ये-जा करतात. पण, येथील प्रश्न अद्यापही जैसे -थेच आहेत. पलावा भागातील उड्डाण पुलाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच गाजतोय. त्यावर राजकारण चांगलंच रंगलंय. पण डोंबिवलीकरांचा त्रास काही कमी झालेला नाही.
रक्षाबंधनाचा आनंदाचा दिवसही वाहतूक कोंडीच्या विघ्नातून डोंबिवलीकरांची सुटका करु शकला नाही. रक्षाबंधनाच्या निमित्तानंही अनेक बहीण-भाऊ एकमेकांच्या घरी राखी बांधण्यासाठी निघाली होती. त्यावेळी देखील शिळ फाटा रोडवर चांगलीच वाहतूक कोंडी झाली होती.
मनसे नेते आणि कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी वाहतूक कोंडीच्या मुद्यावर खरमरीत पोस्ट लिहिली आहे. 'वर्षानुवर्षे तोच रस्ता.. तेच ट्रॅफिक.. तीच घुसमट आणि तीच मागणी.. आता आम्हालाही त्याच त्याच मुद्द्यावरून सरकारला शालजोडीत द्यायला लाज वाटू लागली आहे,' असं सांगत प्रशासनावर टीका केली आहे.
( नक्की वाचा : Dombivli: डोंबिवलीतील पलावा पुल उद्घाटनानंतर काही वेळातच बंद! काय झाला गोंधळ? )
राजू पाटील यांची संपूर्ण पोस्ट
ह्यांना ना जनाची, ना मनाची !
'रक्षाबंधनाच्या दिवशी नागरिकांना ट्रॅफिकचं आंदण आहे.. वर्षानुवर्षे तोच रस्ता.. तेच ट्रॅफिक.. तीच घुसमट आणि तीच मागणी.. आता आम्हालाही त्याच त्याच मुद्द्यावरून सरकारला शालजोडीत द्यायला लाज वाटू लागली आहे पण यांना नागरिकांच्या जीवाची, वेळेची आणि जीवनाची काहीही एक पडलेली नाही.. रस्ते रुंदीकरण केले, कितीतरी ब्रिज बांधले.. त्याचा मलिदा खाऊन झाला.. पुन्हा रस्ते आणि पूल दुरुस्त करण्याची वेळ आली.. म्हणजे पुन्हा मलिदा खाण्याची संधी उपलब्ध झाली.. पण ट्रॅफिक चा प्रश्न काही केल्या या आमच्या ‘बालकमंत्र्याला' सोडवता येत नाही.. कारण या भ्रष्टनाथ मलिदा खाणाऱ्यांसाठी चॉपर आहेत.. हवाईमार्ग आहेत.. रस्त्यावरून जायची वेळ आली तर नागरिकांना थांबवून यांच्या गाड्यांसाठी रस्ता मोकळा करणारे ट्रॅफिक कंट्रोलर आहेत.. पण सामान्य माणसाचं काय ?
कल्याण डोंबिवलीकरांचं अर्ध आयुष्य या ट्रॅफिक च्या गर्दीतच सुरु होणार आणि या गर्दीतच संपणार ! हे सत्ताधारी मात्र या टक्केवारीतून ओरबाडलेला पैसा वाटून दुसऱ्यांचे पक्ष फोडून आपली गद्दार गॅंग वाढविण्यात मग्न राहणार.खरंतर आश्चर्य मला त्या लोकांचे वाटते ज्या लोकांना या वाहतुककोंडीचा त्रास होतो व तरीही ते धर्माच्या व भावनेच्या आहारी जाऊन या बकासुरांना मतदान करतात.'