Dombivli News: सोशल मीडियावर प्रेमाच्या जाळ्यात अडकून उच्चशिक्षित तरुणींची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना डोंबिवलीत समोर आली आहे. तरुणींशी आधी फेसबुक-इन्स्टाग्रामवर मैत्री करायची, नंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे आणि शेवटी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याच नावावर बँकांमधून लाखो रुपयांचे कर्ज काढून पोबारा करणाऱ्या आदर्श म्हात्रे या अट्टल भामट्याला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी आदर्श म्हात्रे हा मूळचा पनवेल परिसरातील रहिवासी असून, यापूर्वी त्याला याच स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती.
140 हून अधिक तरुणींना बनवले सावज
पोलीस तपासातून समोर आलेली आकडेवारी पाहून स्वतः पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे.आरोपी आदर्श म्हात्रे याने आतापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल 140 हून अधिक तरुणींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. या फसवणुकीला कंटाळून आतापर्यंत 11 पीडित तरुणींनी हिंमत दाखवून पोलिसांकडे अधिकृत तक्रारी नोंदवल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या भामट्याच्या जाळ्यात अडकलेल्या बहुतांश महिला या उच्चशिक्षित असून कॉर्पोरेट, बँकिंग, आर्थिक क्षेत्र आणि व्यावसायिक क्षेत्रांत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)
डोंबिवलीतील तरुणीच्या तक्रारीनंतर कारवाई
नवी मुंबई पोलिसांनी आदर्श म्हात्रेला अटक केल्यानंतर त्याच्या फसवणुकीची बातमी वाऱ्यासारखी पसरली. ही बातमी समजताच डोंबिवलीतील एका पीडित तरुणीनेही धाडस दाखवून आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची तक्रार डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस ठाण्यात नोंदवली. या तक्रारीच्या आधारे मानपाडा पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी आदर्श म्हात्रेचा ताबा घेतला आहे.
(नक्की वाचा- US-Iran War Update: युद्ध पुन्हा भडकणार; अमेरिकेने इराणवर मिसाईल डागली; हल्ल्याचं दिलेलं कारणही चर्चेत)
अनेक तरुणीची कोट्यवधींची फसवणूक?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्शविरोधात गुन्हा दाखल करून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपीने केवळ डोंबिवली किंवा नवी मुंबईतच नाही, तर राज्यातील इतर शहरांतील महिलांनाही लुटल्याची शक्यता आहे. आणखी अनेक पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे येण्याची शक्यता असून, फसवणुकीचा हा आकडा आणि एकूण रक्कम कोट्यवधींच्या घरात जाण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या धक्कादायक प्रकरणामुळे सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी वाढणारी मैत्री, ऑनलाईन नातेसंबंध आणि त्यातून होणारी भावनिक व आर्थिक फसवणूक हा अत्यंत गंभीर मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.