Dombivli News: 'त्या'रात्री काय घडलं?डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील अहवाल सादर, रमेश म्हात्रेचं काय होणार?

Dombivli Hospital Assault Case: डॉ. दीपा शुक्ल यांनी आयुक्तांकडे सोपवलेल्या या अहवालात अत्यंत गंभीर बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
Dombivli Hospital Assault Case: या अहवालानंतर रमेश म्हात्रेच्या अडचणीत वाढ झालीय.
डोंबिवली:

Dombivli Hospital Assault Case: डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या मारहाणीचा आणि संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांनी हा राडा घातला होता. आता या अहवालानंतर पालिका आयुक्त संबंधितांवर कोणती आणि किती कठोर कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अहवालातील निष्कर्ष काय?

डॉ. दीपा शुक्ल यांनी आयुक्तांकडे सोपवलेल्या या अहवालात अत्यंत गंभीर बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयात घुसून डॉक्टरांना मारहाण केली आणि दहशत माजवली. याशिवाय त्यांनी थेट सरकारी कामात अडथळा आणल्याचे अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे. या घटनेमुळे डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शास्त्रीनगर रुग्णालयात तात्काळ पोलीस संरक्षण आणि सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी या अहवालात करण्यात आली आहे.

Advertisement

शीव रुग्णालयात जाण्याचा सल्ला का दिला होता?

ज्या गर्भवती महिलेच्या उपचारावरून हा राडा झाला, त्यामागची खरी परिस्थिती आता समोर आली आहे. ही महिला जेव्हा शास्त्रीनगर रुग्णालयात आली, तेव्हा डॉक्टरांनी तिची सोनोग्राफी पाहिली. तिच्या गर्भातील बाळाच्या गळ्याभोवती नाळेचे 2 वेढे होते. अशा स्थितीत प्रसूतीदरम्यान धोका निर्माण झाल्यास नवजात बाळाला अतिदक्षता विभागात (NICU) ठेवावे लागते. पण शास्त्रीनगर रुग्णालयातील NICU मधील सर्व 10 बेड त्यावेळेस फुल्ल होते. त्यामुळेच बाळाचा जीव धोक्यात येऊ नये, म्हणून डॉक्टरांनी महिलेला मुंबईतील शीव (सायन) रुग्णालयात हलवण्याचा वैद्यकीय सल्ला दिला होता.

( नक्की वाचा : डॉक्टर मारहाण प्रकरणी अटक झालेले रमेश म्हात्रे कोण आहेत? वाचा डोंबिवलीतील मातब्बर नेत्याचा संपूर्ण इतिहास )
 

डॉक्टरांनी मुंबईला जाण्याचा सल्ला दिल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी तातडीने स्थानिक नगरसेवक रमेश म्हात्रे यांना बोलावून घेतले आणि त्यानंतर रुग्णालयात मारहाणीचा हा सर्व प्रकार घडला. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्रे गोळा करून विष्णूनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही तक्रार कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच दाखल करण्यात आली आहे.

( नक्की वाचा : KDMC News: केडीएमसीत राजकीय भूकंप! ठाकरे गट अन् मनसे आले एकत्र; भाजपाने दिला सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा )
 

महिलेची प्रसूती आणि बाळाची सद्यस्थिती काय?

ज्या दिवशी हा राडा झाला, त्याच रात्री साडेअकरा वाजता संबंधित महिलेला कल्याण पश्चिमेतील पालिकेच्या वसंत व्हॅली प्रसूती गृहात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया (सिझर) करून तिची प्रसूती केली. पण, जन्मलेल्या मुलीच्या गळ्याभोवती नाळेचे वेढे असल्याने तिला पुढील उपचारांची गरज होती. पालिकेच्या रुग्णालयात सोय नसल्याने नवजात बालिकेला तातडीने एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. तिथे 5 दिवस उपचार घेतल्यानंतर महिला आणि बाळ दोघांचीही प्रकृती सुधारल्याने त्यांना सुखरूप घरी पाठवण्यात आले आहे.