जाहिरात

डॉक्टर मारहाण प्रकरणी अटक झालेले रमेश म्हात्रे कोण आहेत? वाचा डोंबिवलीतील मातब्बर नेत्याचा संपूर्ण इतिहास

Who is Ramesh Mhatre: डोंबिवलीत अटक करण्यात आलेले नगरसेवक रमेश म्हात्रे नेमके कोण आहेत आणि त्यांचे स्थानिक राजकारणातील वजन किती मोठे आहे, याविषयी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे

डॉक्टर मारहाण प्रकरणी अटक झालेले रमेश म्हात्रे कोण आहेत? वाचा डोंबिवलीतील मातब्बर नेत्याचा संपूर्ण इतिहास
Ramesh Mhatre: रमेश सुकऱ्या म्हात्रे हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) राजकारणातील अत्यंत जुने नाव आहे.
डोंबिवली:

Who is Ramesh Mhatre: डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात महिला डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. सत्तारुढ शिवसेना पक्षाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनीच ही मारहाण केली होती. याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ डोंबिवलीत डॉक्टरांनी आंदोलन सुरु केलं होतं. या मारहाणीला 24 तास उलटल्यानंतरही रमेश म्हात्रेला अटक झाली नव्हती. अखेर 'NDTV मराठी'नं हे प्रकरण सातत्यानं लावून धरल्यानंतर म्हात्रेला अटक झालीय

 या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आहे, ते रमेश म्हात्रे नेमके कोण आहेत आणि त्यांचे स्थानिक राजकारणातील वजन किती मोठे आहे, याविषयी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मोठी चर्चा सुरू झाली आहे

सामान्य कार्यकर्त्यापासून ते तब्बल 5 वेळा नगरसेवक आणि 4 वेळा स्थायी समितीचे सभापतीपद भूषवणाऱ्या या मोठ्या नेत्याला पोलिसांनी थेट त्यांच्या घरातून बेड्या ठोकल्या आहेत. एका सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना बेड शिल्लक नसल्याच्या कारणावरून मारहाण करणे या ज्येष्ठ नेत्याला इतके महागात पडले आहे की, आता त्यांच्या राजकीय कारकिर्दीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

( नक्की वाचा : Dombivli News : डोंबिवलीचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रेला अखेर अटक, आता शिंदे काय कारवाई करणार? )
 

कोण आहेत रमेश म्हात्रे?

रमेश सुकऱ्या म्हात्रे हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) राजकारणातील अत्यंत जुने आणि मातब्बर नाव मानले जाते. ते डोंबिवलीतील कोपरगाव परिसराचे प्रतिनिधित्व करतात. वर्ष 2000 पासून ते स्थानिक राजकारणात प्रचंड सक्रिय असून, त्यांनी तब्बल 5 वेळा नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडून येण्याचा विक्रम केला आहे. 

इतकेच नव्हे तर, महापालिकेची तिजोरी ज्या समितीच्या हातात असते, त्या प्रतिष्ठेच्या स्थायी समितीचे सभापतीपद त्यांनी तब्बल 4 वेळा भूषवले आहे. यावरून त्यांचे केडीएमसीच्या राजकारणातील स्थान किती मजबूत आहे, हे स्पष्ट होते. ते बांधकाम व्यवसायाशीही जोडलेले आहेत.

( नक्की वाचा : राष्ट्रवादीत पुन्हा काहीतरी शिजतंय? खुद्द शरद पवार हजर असूनही रोहित पवार बैठकीला गैरहजर,आमदार संतापले )
 

विधानसभेची निवडणूक आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

रमेश म्हात्रे यांनी केवळ स्थानिक महापालिकेतच नाही, तर विधानसभा निवडणुकीतही आपले नशीब आजमावले आहे. त्यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून 2009 आणि 2019 मध्ये अशा 2 वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, या दोन्ही निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 

शिवसेनेत जेव्हा  फूट पडली, तेव्हा रमेश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. शिंदे गटातही त्यांना कल्याण-डोंबिवली भागात मोठे महत्त्व दिले जात होते.

विवादास्पद कारकीर्द 

रमेश म्हात्रे यांचा वाद आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीशी जुना संबंध राहिला आहे. त्यांच्यावर आत्तापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र, कायदेशीर प्रक्रियेनंतर यातील 10 गुन्ह्यांमध्ये त्यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. आता 6 जुलै रोजी शास्त्रीनगर सरकारी रुग्णालयात एनआयसीयू बेड रिकामे नसल्याच्या किरकोळ कारणावरून महिला डॉक्टर सृष्टी बाविस्कर आणि डॉक्टर वैभव साळुंखे यांच्यासह नर्सना मारहाण केल्याचा गंभीर गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला आहे. 

या संतापजनक प्रकारानंतर त्यांच्यासह 5 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना घरातून अटक केली आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com