अमजद खान
केडीएमसीच्या रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे अनेकांचे मृत्यू झाल्याच्या घटना अनेक वेळा समोर आल्या आहेत. काही दिवसापूर्वीच एक चिमुकली आणि तिच्या मावशीचा सर्पदंशाने उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आधी त्यांची तब्बेत ठिक आहे असं सांगण्यात आलं. पण आधी चिमुकलीचानंतर तिच्या मावशीचा मृत्यू झाला. या प्रकरणात एका डॉक्टरला निलंबीत करण्यात आले आहे. मात्र मंगळवारी मृतांचे नातेवाईक आणि नागरीकांसह शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केडीएमसी विरोधात मोर्चा काढला. जवळपास तीन तास हा मोर्चा सुरु होता. अखेर पंधरा दिवसात संबंधितांवर कारवाईच्या लिखीत आश्वासनानंतर मोर्चा संपला.
कल्याणमध्ये रुक्मीणीबाई आणि डोंबिवलीत शास्त्रीनगर ही दोन केडीएसीची रुग्णालये आहेत. पण या रुग्णालयात निष्काळजी पणामुळे अनेकांचे बळी गेले आहेत, असा आरोप वारंवार झाला आहे. काही दिवसापूर्वी एका चिमुकलीसह तिच्या मावशीला साप चावला. त्यानंतर त्या दोघींना डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारा दरम्यान दोन्ही दगावल्या. आधी चिमुकलीचा मृत्यू झाल त्यानंतर मावशी ही हे जग सोडून गेली. यानंतर डोंबिवलीत एकच संतापाची लाट उसळली. मंगळवारी शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयावर मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान केडीएमसीच्या विरोधात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. मोर्चा दरम्यान घोषणाबाजी केली.
नक्की वाचा - Dombivali News: ती रडत होती मात्र सांगू शकत नव्हती, जेव्हा खरं कारण समजलं तेव्हा...
मोर्चाचे नेतृत्व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे, राष्ट्रवादीचे भाऊ पाटील, काँग्रेसचे नेते संतोष केणे, मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, शहर प्रमुख राहुल कामत, विनिता पाटील यांनी केले. मोर्चा शास्त्रीनगर रुग्णलायात पोहचला. यावेळी रुग्णालयाच्या परिसरात ठिय्या देण्यात आला. नही चाहिये दांडीया गरबा हमको चाहिऐ आरोग्य सेवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. फायर ब्रँड आमदार खासदार तरीपण ढिसाळ आरोग्य व्यवस्था. यावेळी काहींची भाषणं झाली. सगळ्यांचा आक्रोश सरकार आणि महापालिका प्रशासना विरोधात होता. मोठे दावे केले जातात. पण काही होत नाही. या दरम्यान रुग्णाचे नातेवाईक मोर्चेकऱ्यांना त्यांची व्यथा सांगत होते. यावेळी मोर्चेकऱ्यांना प्रशासनाकडून निरोप आला. मुख्य आरोग्य अधिकारी त्यांना भेटणार आहेत. हे ऐकल्यावर मोर्चेकरी आणखीन संतापले. आमच्या सोबत चर्चा आयुक्त करणार असतील तरच आम्ही चर्चा करुन अन्यथा आम्ही चर्चा करणार नाही. ही भूमीका मोर्चेकऱ्यांनी घेतली.
पोलिसांनी समजूत घालण्याच्या प्रयत्न केला. मात्र मोर्चेकरी त्यांचा भूमिकेवर ठाम होते. हा सगळा प्रकार अडीच तास सुरु होता. अखेर केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड हे मोर्चेकऱ्यासोबत चर्चा करण्यासाठी आले. माोर्चेकऱ्यांचे एक शिष्टमंडळ चर्चेसाठी रुग्णालयात गेले. मनसेचे पदाधिकाऱ्यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना यावेळी टाळे दाखवले. रुग्णालयाने निट सेवा द्यावी नाहीतर टाळे लावू असं त्यांना सांगायचं होतं. पंधरा दिवसाच्या आत संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी योगेश चौधरी आणि मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ल यांनी या काळात काम करू नये अशी मागणी ही करण्यात आली. ती मान्य करण्यात आली आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही तपासले जाईल. जो दोषी असेल त्यावर कारवाई होईल असे आश्वासन गायकवाड यांनी यावेळी दिले.