Dombivli News: डोंबिवलीतील राजकीय वर्तुळात सध्या एका मोठ्या वादाची चर्चा रंगली आहे. एकाच पक्षातील दोन गट समोरासमोर आल्याने खळबळ उडाली असून हा वाद आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. राजकीय पदनियुक्तीवरून सुरू झालेला हा कलह इतका वाढला की, रस्त्यावर मारहाण आणि धमकी देण्यापर्यंत मजल गेली आहे. या प्रकरणी पक्षाच्या एका मोठ्या पदाधिकाऱ्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
काय आहे प्रकरण?
हा संपूर्ण प्रकार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) मध्ये घडला आहे. पक्षाचे पदाधिकारी विकास खैरनार यांनी या संदर्भात विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. खैरनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते कर्वे रोड परिसरातून जात असताना दोन दुचाकींवरून आलेल्या काही जणांनी त्यांचे वाहन अडवले. यावेळी त्यांना मारहाण करण्यात आली आणि जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने हालचाली करत गुन्हा नोंदवला आहे.
( नक्की वाचा : Warkari : पवारांच्या 'प्रतिगामी' आरोपावर फडणवीसांचे चोख उत्तर; वारकरी संप्रदायात अर्बन नक्षलवाद्यांची घुसखोरी! )
युवक जिल्हाध्यक्षासह चौघांवर गुन्हा
विकास खैरनार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष जय जाधव यांच्यासह संदीप पाईकराव, नितीन इंगोले आणि डॉ. सुभाष अंभोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकाच पक्षातील जबाबदार पदाधिकाऱ्यांवर अशा प्रकारे गुन्हे दाखल झाल्याने पक्षांतर्गत असलेली गटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे.
जुना वाद आणि प्रत्यारोप
डोंबिवलीतील आरपीआयमधील हा वाद काही आजचा नाही. काही दिवसांपूर्वीच डॉ. सुभाष अंभोरे यांनी विकास खैरनार यांच्या विरोधात मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात खैरनार यांना अटकही झाली होती आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. आता खैरनार यांनी प्रतिआरोप करत गुन्हा दाखल केल्याने हा वाद जुना असल्याचे स्पष्ट होत आहे. पदनियुक्तीवरून सुरू झालेली ही ठिणगी आता मोठ्या संघर्षात रूपांतरित झाली आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
पक्षातील पदनियुक्ती आणि वर्चस्व गाजवण्यावरून या दोन्ही गटांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती. त्याचेच पर्यावसान आता पोलिसांमधील तक्रारींमध्ये झाले आहे. विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे. या वादामागे नेमकी कोणती कारणे आहेत आणि याला वरिष्ठ पातळीवरून कसे हाताळले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.