Dombivli News : डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि समर्थकांकडून डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र इंडियन मेडिकल असोसिएशनने येत्या सोमवारी, 20 जुलै 2026 रोजी 24 तासांचा राज्यस्तरीय बंद पुकारला आहे. या बंदमध्ये कल्याण डोंबिवलीतील डॉक्टरांच्या सर्व संघटना पूर्णपणे सहभागी होणार असल्याचे आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. राजेश राघव राजू यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
डोंबिवलीतील घटनेचे राज्यभरात पडसाद
6 जुलै रोजी शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. मात्र प्रशासनाने केलेली कायदेशीर कारवाई अपुरी असल्याचा आरोप आयएमएने केला आहे. डॉ. राजेश राघव राजू म्हणाले, डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी शासनाने असलेला कायदा अधिक कडक करावा. रुग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित कामाचे वातावरण मिळावे. यासाठी स्पष्ट एसओपी तयार करावी. तसेच अशा घटना भविष्यात टाळण्यासाठी शासनाने एक स्वतंत्र समुपदेशन समिती स्थापन करावी.
राज्यातील सर्व रुग्णालयांच्या ओपीडी बंद...
या 24 तासांच्या बंददरम्यान राज्यातील सर्व रुग्णालयांच्या ओपीडी बंद राहतील. मात्र आपत्कालीन सेवा, अपघात विभाग आणि अतिदक्षता विभाग सुरू ठेवण्यात येणार आहेत, असे संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले. शासनाने यानंतरही कडक कारवाई न केल्यास पुढील महिन्याच्या 9 ऑगस्टपासून बेमुदत बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या पत्रकार परिषदेला निमा संघटनेचे शाम पोटदुखे, आयुर्वेद व्यासपीठचे वैद्य अभिजीत ठाकूर, कल्याण होमिओपॅथिक डॉक्टर संघटनेचे डॉ. राहुल काळे, केंपस्वाचे सुभाष कदम आणि इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ. किरण टोकेकर उपस्थित होते. डोंबिवलीतील या घटनेनंतर राज्यभरातील वैद्यकीय क्षेत्रात अस्वस्थता असून, सोमवारच्या बंदमुळे रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.