कल्याण-शीळ रस्त्यावरच्या पलावा पुलाचं आज (शुक्रवार 4 जुलै) उद्घाटन करण्यात आले. हा पूल वाहतुकीसाठी महत्त्वाचा असल्यानं प्रवाशांची हाल कमी होतील अशी आशा होती. पण, भलतंच घडलं. हा पूल चक्क काही वेळातच बंद करावा लागला. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही पक्ष आमने-सामने आले. तसंच मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी देखील या प्रकरणात उडी घेत टीका केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
पलावा जंक्शन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पलावा उड्डाण पुलाचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून खाजगी कंत्राटदाराकडून करण्यात आले.या पूलाच्या दोन मार्गिका आहे. या पूलाची एक मार्गीका तयार झाली. दुसरी मार्गिकेचे काम सुरु आहे. एका मार्गिकेवरुन वाहतूक जून अखेर सुरु होणार अशी माहिती शिंदे गटाचे आमदार राजेश माेरे यांनी दिली होती. त्यानंतर ठाकरे गट आणि मनसेने एकत्रित येऊन या पूलावर आंदोलन केले .
( नक्की वाचा : Dombivli: डोंबिवलीच्या ड्रग्ज तस्करीचा मोहरक्या सापडला! कार डिलर्सच्या परदेशीवारीचं रहस्य उलगडणार )
शिंदे गटाकडून आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाल लाडके, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांच्या उपस्थितीत पलावा पूल वाहतुकीसाठी आज खुला करण्यात आला. त्यानंतर दुपारी हा पूल लगेच वाहतूकीसाठी बंद केला गेला. पूल वाहतूकासाठी खुला करताच त्याठिकाणी वाहनं स्लिप झाल्याचा दावा ठाकरे गटाचे उप जिल्हा प्रमुख राहूल भगत यांनी केला. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी काही काळ बंद करावा लागला. पूलाचे काम पूर्ण झाले नसताना पूल घाई गडबडीत सुरु केला असल्याचा आरोप भगत यांनी केला. तर मनसेने नेते राजू पाटील यांनी पूलाचे काम निकृष्ट दर्जाचे आहे असे ट्वीट करीत सत्ताधारी पक्षावर टीका केली.
अखेर पूल सुरु
दरम्यान, दिवसभर या प्रकरणात राजकारण तापल्यानंतर अखेर शुक्रवारी संध्याकाळीच हा पूल सुरु झाला. पण, प्रशासनाचा निष्काळजी कारभार यामुळे पुन्हा चव्हाट्यावर आला. तसंच या सर्व गदारोळात या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
गुन्हा दाखल करणार
दरम्यान या संपूर्ण प्रकरणात गुन्हा दाखल करणार असल्याची घोषणा ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी केले आहे. म्हात्रे यांनी तसं ट्विट केलं आहे.
काम अर्धवट असताना घाईघाईत पलावा पूल सुरू केला…दुचाकीस्वार पडले, अपघात झाले, आणि दोन तासात पूल बंद! शिवसैनिक या निष्काळजीपणाविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन देणार. जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही!, असं ट्विट म्हात्रे यांनी केलं.
शिंदे गटाचं उत्तर
ठाकरे गट आणि मनसेने केलेल्या टिकेवर शिंदे गटाचे उप जिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी उत्तर दिलं आहे. ज्यांनी टिका केली आहे. ते आमदार असताना त्यांच्या घराशेजारीच काम सुरु होते. ते त्यांनी का रोखले नाही वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी पूल काही वेळेकरती बंद केला, असं उत्तर कदम यांनी दिलं.