मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरी रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये आता मोठे बदल होणार आहेत. डीसी टू एसी बदलानंतर, आता रेल्वे प्रशासनाने सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या स्थानकांचा कायापालट करण्याचा 'मास्टर प्लॅन' तयार केला आहे. या योजनेसाठी सर्वप्रथम डोंबिवली रेल्वे स्थानकाची निवड करण्यात आली आहे.
सर्वाधिक कमाईचे स्थानक
मध्य रेल्वेवर कल्याण, ठाणे आणि दादर येथे सर्वाधिक गर्दी असली तरी, रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न हे डोंबिवली स्थानकातून मिळते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आजूबाजूच्या भागातील प्रवासी मासिक पास काढण्यासाठी तसेच कोपरपर्यंतच्या प्रवासासाठी डोंबिवली स्थानकाला पसंती देतात. दररोज तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्याही येथे लक्षणीय आहे. ज्यामुळे हे स्थानक मागील अनेक वर्षांपासून रेल्वेच्या उत्पन्नात अग्रेसर राहिले आहे.
(नक्की वाचा- Viral VIDEO: फोनवरचं बोलणं ऐकून Uber ड्रायवरने गाडी थांबवली अन्... तरुणीच्या आयुष्यभर लक्षात राहील असा क्षण)
कसं असेल डोंबिवली स्थानक?
डोंबिवली स्थानकात प्रवाशांची नेहमीची गर्दी आणि अपुरी जागा अशी परिस्थिती असते. मात्र आता लवकरच हे परिस्थिती बदलणार आहे. मध्य रेल्वेने डोंबिवली स्थानकाची 'मॉडर्न स्थानक'म्हणून निवड केली असून, या अद्ययावतीकरण प्रकल्पात अनेक महत्त्वपूर्ण बदल केले जाणार आहेत. महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.
- स्थानकात प्रवाशांसाठी शॉपिंग मॉल आणि 70 आसनी मल्टिप्लेक्स थिएटरची उभारणी केली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना आता प्रवासासोबतच मनोरंजन आणि खरेदीची सुविधा स्थानकातच उपलब्ध होणार आहे.
- स्थानकात अस्तित्वात असलेल्या तीन पादचारी पुलांची रुंदी वाढवली जाणार आहे. यासोबतच आणखी एका नवीन पुलाची उभारणी केली जाईल.
- हे सर्व पादचारी पूल एकमेकांशी जोडलेले असतील. ज्यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि प्रवासात सुलभता येईल.
- स्थानकातील बुकिंग ऑफिससह अन्य महत्त्वाची कार्यालये पहिल्या मजल्यावर स्थलांतरित केली जातील.
(नक्की वाचा- Navi Mumbai Airport: मुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार! कुठे-कुठे असतील थांबे?)
रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती
रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने या महत्त्वाकांक्षी प्रस्तावावर काम सुरू केले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, हा डोंबिवली मॉडर्न स्थानक प्रकल्प यशस्वी ठरल्यास, याच धर्तीवर मध्य रेल्वेवरील इतर महत्त्वाच्या स्थानकांचाही कायापालट करण्याचा रेल्वेचा मानस आहे. यामुळे भविष्यात मुंबईतील उपनगरी रेल्वे स्थानकांचे स्वरूप पूर्णपणे बदलणार आहे.