KDMC News: शास्त्रीनगर रुग्णालयाचा गलथान कारभार! रुग्णाला 12 औषधे लिहून दिली; पालिकेच्या मेडिकलमध्ये एकही नाही

डोंबिवलीतील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्वचेच्या विकाराने त्रस्त असलेल्या 2 वर्षांच्या चिमुकल्याला डॉक्टरांनी 12 औषधे लिहून दिली, त्यातील एकही शासकीय मेडिकलमध्ये उपलब्ध नव्हते.

जाहिरात
Read Time: 2 mins

डोंबिवलीतील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाचा कारभार गेल्या काही काळापासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. आता पुन्हा एकदा या रुग्णालयाच्या निष्काळजी कारभाराचा फटका एका गरीब कुटुंबाला बसला आहे. शास्त्रीनगर रुग्णालयात नेमके चाललेय तरी काय, असा संतप्त प्रश्न आता डोंबिवलीकर नागरिक उपस्थित करत आहेत. एका 2 वर्षांच्या चिमुकल्या उपचारासाठी तब्बल 12 औषधे लिहून देऊनही, शासकीय मेडिकलमध्ये त्यापैकी एकही औषध उपलब्ध नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नेमका काय आहे प्रकार?

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीत राहणारे जगदीश राठोड यांच्या 2 वर्षांच्या चिमुकल्या मुलाला, म्हणजेच वेदांस राठोड याला त्वचेचा त्रास होत होता. मुलाला खाज सुटणे व पुरळ येणे अशा समस्या जाणवू लागल्याने त्याचे वडील जगदीश राठोड त्याला उपचारासाठी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात घेऊन आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी वेदांसची प्राथमिक तपासणी केली. तपासणीनंतर डॉक्टरांनी चिमुकल्यासाठी तब्बल 12 वेगवेगळ्या प्रकारची औषधे कागदावर लिहून दिली. डॉक्टरांनी ही सर्व औषधे रुग्णालयाच्या हद्दीत असलेल्या अधिकृत शासकीय मेडिकलमधून मोफत घेण्यास सांगितले.

Advertisement

(नक्की वाचा-  Pimpri Chinchwad News: "आई मी नदीत उडी मारतोय..."; रात्रीच्या वेळी लंडन ब्रिजवर उभं राहून व्हिडीओ कॉल, अन्...)

शासकीय मेडिकलमध्ये 'एकही' औषध नाही

डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जगदीश राठोड मुलाला घेऊन रुग्णालयातील मेडिकल काउंटरवर गेले. मात्र, तेथे गेल्यानंतर त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मेडिकलमधील कर्मचाऱ्यांनी औषधांची चिठ्ठी पाहताच, "यातील एकही औषध आमच्याकडे उपलब्ध नाही," असं सांगितलं. सर्वच्या सर्व 12 औषधे शासकीय रुग्णालयात उपलब्ध नसून ती बाहेरून खाजगी मेडिकलमधून खरेदी करण्यास सांगितलं.

(नक्की वाचा-  DMart Ready: डीमार्टची 7 शहरांतील सेवा बंद; स्वस्त वस्तू देऊनही स्पर्धेतील 'ही' रणनीती ठरली वरचढ)

केडीएमसी आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

"महापालिकेच्या रुग्णालयात जर गरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना साधी औषधेही मिळत नसतील, तर नागरिकांनी उपचारासाठी कुठे जावे?" असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. पालिकेचे रुग्णालय असूनही रुग्णांना महागडी औषधे बाहेरून विकत घ्यावी लागत असतील, तर या सरकारी योजनांचा काय फायदा, अशी विचारणा केली जात आहे. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Topics mentioned in this article