राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आणखी एक शेवटची संधी देण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक 3 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्यात येणार आहे.
याबाबतीच सविस्तर माहिती शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. महेश पालकर हे देणार आहेत. या माध्यमातून अकरावीच्या विद्यार्थ्यांना एक संधी मिळणार आहे. राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातून कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होवू नये यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये इयत्ता 11 वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत.
आतापर्यंत इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या 10 फेऱ्या राबविण्यात आलेल्या आहेत. इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या शेवटच्या संधीबाबतच्या सविस्तर सूचना 3 ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात येणार आहेत. या फेरीमध्ये भाग-2 व प्राधान्यक्रम नोंदविणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यास गुणानुक्रमे कनिष्ठ महाविद्यालय देण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी या प्रवेश प्रक्रियेची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालकांमार्फत करण्यात आले आहे.