ऑस्ट्रेलियाचे माजी परराष्ट्र मंत्री तथा खासदार टिम वॅट्स यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्र यांच्यात शेती, वैद्यकीय तंत्रज्ञान, शिक्षण आदी क्षेत्रात वाणिज्यिक संबंध दृढ करण्यातबाबत चर्चा झाली. विशेष म्हणजे यावेळी शिंदे यांनी या ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाला चक्क वडापावची मेजवानी दिली. परदेशी पाहुण्यांनी ही वडापाव खाण्याचा आनंद घेतला. वॅटस् यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी खासदार मिलिंद देवरा, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असिम गुप्ता, प्रधाव सचिव नविन सोना आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक वाढीसाठी मोलाचे योगदान देत असून मुख्य फोकस पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर आमचा भर असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. मेट्रो रेल्वे, कोस्टल रोड, अटल सेतू यासारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प राज्यात पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईमध्ये मेडीसिटी, एज्युसिटी करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी ऑस्ट्रेलियाचे खासदार टिम वाट्स यांचे स्वागत करतानाच शिंदे यांनी मुंबईची ओळख असलेला वडा पाव आग्रहाने खाऊ घातला.
नक्की वाचा - Stray dogs: भटक्या कुत्र्यांची आता खैर नाही, 2 वेळा चावला तर थेट 'जन्मठेपे'ची शिक्षा
विशेष म्हणजे वॅटस् आणि त्यांच्या समवेत असलेले ऑस्ट्रेलियाचे पश्चिम भारतासाठीचे वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी आनंदाने त्याचा स्वाद घेतला. वीस वर्षांपूर्वी आपण मुंबईत क्रिकेटचा समाना पाहण्यासाठी आलो होतो अशी आठवण वॅटस् यांनी यावेळी आवर्जून सांगितली. शिवाय वडापाव हा रुचकर होता असंही त्यांनी सांगितलं. मुंबईत आला आणि वडापाव खाल्ला नाही असं होत नाही. त्यामुळेच परदेशी पाहुण्यांनाही पाहुणचार करताना शिंदे यांनी वडापावची मेजवाणी दिली.