लोकसभेचा निवडणूक निकालावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रीया आली आहे. त्यांनी राज्यातील निकालावर बोलताना उमेदवारी जाहीर करण्यात आम्हाला उशिर झाला. त्याचा फटका बसल्याची कबुली दिली आहे. शिवाय काही जागा आम्ही खुप कमी फरकाने पराभूत झालो आहोत असेही ते म्हणाले. शिवाय विरोधकांनी जो संविधान बदलण्याचा अपप्रचार केला त्यालाही आम्ही योग्य पद्धतीने तोंड देवू शकलो नाही. संभ्रम निर्माण केला गेला. त्याबाबत आम्ही निश्चितच मिमांसा करू असेही शिंदे म्हणाले. मात्र केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एनडीएला पुर्ण बहुमत मिळाले असून मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सरकार बनवले जाईल असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - बारामती शरद पवारांचीच! संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पारड्यात अवघ्या सहा जागा जाताना दिसत आहे. मात्र असे असले तरी एनडीएचा विजय झाला आहे असे शिंदे म्हणाले. मात्र जे लोक मोदींना आणि भाजपला तडीपार करण्याची भाषा करत होते त्यांनाच सत्तेपासून तडीपार केल्याचा टोला शिंदे यांनी लगावला आहे. विरोधकांनी वोट बँकेचे राजकारण केले त्याचा परिणाम राज्यात दिसून आला. शिवाय संविधान बदलाबाबत संभ्रम निर्माण केला गेला त्याचाही फटका महायुतीला बसल्याचे ते म्हणाले. मात्र आता जनतेला संभ्रम करणाऱ्यांचा खरा चेहरा दिसेल असेही ते म्हणाले.
हेही वाचा - दक्षिण मध्य मुंबईची ठाकरेंना साथ, अनिल देसाईंचा दणदणीत विजय
महायुतीचा विकासाचा अजेंडा यापुढेही चालूच राहीले. मोदींनी देशाला विकासाच्या मार्गावर नेले आहे. यापुढेही असेच काम सुरू राहील असेही ते म्हणाले. दरम्यान ठाणे आणि कल्याणमध्ये झालेल्या विजयाबाबत शिंदेंनी समाधान व्यक्त केले आहे. शिवाय ठाणे हा नेहमीच शिवसेनेचा गड राहीला आहे. तो गड आम्ही राखला त्यासाठी ठाणेकरांचे आभार मानतो असेही शिंदे म्हणाले. दरम्यान निवडणूकीचे आत्मपरिक्षण आपण निश्चित करू असेही ते म्हणाले.