- मुंबईत मान्सून न आल्याने दमट आणि उष्ण हवामान कायम आहे, रात्रीही उष्णता जाणवते
- उष्ण वातावरणामुळे आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवण्याची भीती
- मान्सून दाखल न झाल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण
El Nino Effect Mumbai: जून महिना संपत आला, तरी मुंबई अजूनही मान्सूनच्या प्रतीक्षेतच आहे. परिस्थिती अशी आहे की, दिवसाप्रमाणे रात्रीच्या वेळीही लोक दमट आणि उकाड्यानै हैराण होत आहेत. मुंबईतील अनेक भागांमध्ये रात्रीचे तापमान 30 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असते. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनचा वेग मंदावल्याने मुंबईत उष्णता जाणवत आहे. कारण मुंबईत यापूर्वी असे वातावरण कधीच पाहिले गेले नव्हते. साधारणतः 11 जूनपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होतो. पण यंदा मुंबईत मान्सून दाखल न झाल्याने शहरात दमट आणि उष्ण हवामान कायम आहे.
रात्रीच्या वेळेसही जीवघेणा उकाडा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्राकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण खूप वाढले आहे. तसेच आकाशात ढग असल्याने दिवसभराची उष्णता रात्रीही कायम राहते. यामुळे तापमानात फारशी घट होत नाहीय आणि रात्री असामान्यपणे उष्णता जाणवत आहे. रात्रीच्या वेळेस सातत्याने वाढणारी उष्णता आरोग्यासाठी चिंतेचा विषय ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळेस शरीराला पुरेशा थंडावा मिळत नाही, ज्यामुळे 'हीट स्ट्रेस'चा धोका वाढू शकतो. प्रामुख्याने वृद्ध, लहान मुले आणि बाहेर काम करणाऱ्या लोकांवर याचा सर्वाधिक परिणाम होतो. यंदा पश्चिमी वाऱ्यांमुळे आणि मोठ्या प्रमाणावरील हवामानातील बदलांमुळे मान्सूनची प्रगती मंदावली आहे.
मान्सून लांबण्याची कारणे काय?
हवामान शास्त्रज्ञांच्या मते यंदा मोठ्या प्रमाणावरील हवामान बदलांमुळे मान्सूनची प्रगती मंदावली आहे. मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता, म्हणजे तीन दिवस उशीराने मान्सून केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतरही त्याचा उत्तर आणि मध्य भारताच्या दिशेने सरकण्याचा वेग अपेक्षेपेक्षा कमी राहिला. याव्यतिरिक्त प्रशांत महासागरात 'अल-निनो'ची वापसी आणि त्याच्याशी संबंधित हवामान परिस्थितीचा प्रभाव देखील दिसून येत आहे, ज्यामुळे पावसाच्या हालचालींवर परिणाम होत आहे.
(नक्की वाचा : Mumbai Lakes Water Level: मान्सून लांबला, मुंबईची चिंता वाढली; तलावांमध्ये उरलाय फक्त इतके टक्के पाणीसाठा, पाहा तुमच्या भागातील स्थिती)
महाराष्ट्रात 20 जूनच्या सुमारास मान्सून सक्रियपणे पुढे सरकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई आणि महानगर क्षेत्रातही (एमएमआर) याच काळात मान्सून पूर्णपणे दाखल होण्याची अपेक्षा आहे. पण हवामान विभागाने म्हटले आहे की, पुढील काही दिवसांत तुरळक पाऊस, विजांचा कडकडाट होऊन पावसाची शक्यता आहे. तरी चांगला पाऊस होण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागू शकते.
शेतकऱ्यांपासून सामान्य लोकांपर्यंत चिंता वाढली
मान्सून लांबल्याचे दुष्परिणाम केवळ शहरांमधील उष्णतेपुरता मर्यादित नाही. महाराष्ट्रातील अनेक भागांत शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली असून ते चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, जून महिन्याचा शेवटचा आठवडा आणि जुलैच्या सुरुवातीचे दिवस हे शेतीच्या कामांसाठी अतिशय महत्त्वाचे असतील. सध्या मुंबईकरांसाठी मान्सून हीच सर्वात मोठी आशा आहे. जोपर्यंत पावसाची जोरदार सुरुवात होत नाही, तोपर्यंत शहराला उष्णता, उकाडा आणि उष्ण रात्रींचा सामना करावा लागू शकतो.