मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फ्लेमिंगोंच्या थव्याला विमानाने दिलेल्या धडकेत तब्बल 40 पक्षांचा मृत्यू झाला आहे. घाटकोपरच्या लक्ष्मी नगर भागात एमिरेट्सच्या एका विमानाने फ्लेमिंगोच्या थव्याला धडक दिली. परिणामी तब्बल 40 फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला तर दुसरीकडे विमानाचं मोठं नुकसान झालं आहे. यानंतर विमान तातडीने उतरवण्यात आलं. सुदैवाने या अपघातात विमानातील सर्व प्रवासी आणि केबिन क्रू सुरक्षित आहेत.
पक्षांच्या कळपाला विमानाची धडक
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री 9 वाजेदरम्यान एमिरेट्सच्या EK 508 या विमानाने पक्षांच्या थव्याला धडक दिली. यानंतर विमानाने सुरक्षितपणे विमानतळावर उतरवलं. सोमवारी रात्री उशिरा तपास केल्यानंतर 29 फ्लेमिंगोचे मृतदेह सापडले. मंगळवारी सकाळी फ्लेमिंगोचे एकूण 40 मृतदेह सापडले आहेत.
नवी मुंबईतील फ्लेमिंगोंच्या अधिवासाला धोका
मुंबई आणि नवी मुंबईच्या तटावरील भागात फ्लेमिंगांचा प्रसिद्ध अधिवास आहे. हे प्रवासी पक्षी डिसेंबरच्या जवळपास या तटावर पोहोचतात आणि मार्च-एप्रिलपर्यंत आढळून येतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून फ्लेमिंगोचं निवासस्थान धोक्यात आढळलं आहे. यापूर्वीही नवी मुंबईतील साइन बोर्डाला धडक दिल्याने काही पक्षांचा मृत्यू झाला होता.
#WATCH | Mumbai | 40 flamingos were found dead at several places in the Ghatkopar area after being hit by an Emirates aircraft, today
— ANI (@ANI) May 21, 2024
Gajanan Bellale, Assistant Municipal Commissioner, BMC says, "A resident in this area informed that a flamingo bird had fallen. Primarily it… pic.twitter.com/Xg3oX7ZxE7
ठाणे-नवी मुंबई हा भाग फ्लेमिंगोच्या अधिवासासाठी उत्तम असल्याचे मानले जाते. फ्लेमिंगोच्या संवर्धनासाठी दरवर्षी शासनाकडून हजारो रुपये खर्च होत असतात. फ्लेमिंगो सफारीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला आर्थिक फायदा देखील होत असतो. नवी मुंबई येथे डी पी एस फ्लेमिंगो तलावात गेल्या आठवड्यांपूर्वी काही फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला होता. तलावात होणाऱ्या भरतीचा प्रवाह रोखल्याने हा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सर्वच पर्यावरण प्रेमींकडून या घटनेचा निषेध करण्यात आला. पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ठाणे क्रिक, रामसर नवी मुंबई आणि उरण येथील फ्लेमिंगोंचा अधिवास वाढवण्यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रामसर येथील फ्लेमिंगोंचा अधिवास पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. मात्र रामसर येथे देखील म्हणावे तेवढे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप या पर्यटकांकडून केला जात आहे.