साजन ढाबे
वाशिम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी मुगाचं उत्पादन घेतलं जातं. मात्र यंदाच्या हंगामात वातावरणात सातत्यानं बदल होत असल्याने मूग पिकावर विषाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळं उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. खरीपाचे हातातोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीने वाया गेले तर रब्बीचे पीक धुईने खाऊन टाकले आहे. उन्हाळी पिकांमध्ये कसर भरून काढण्यासाठी बळीराजाने परिश्रम घेतले, मात्र आता बळीराजाच्या अपेक्षेवर करपा रोगाने पाणी फिरविले असल्याचे दिसून येत आहे.
मागील अनेक महिन्यांपासून हवामानात वारंवार होत असलेल्या बदलाचा फटका पिकांना बसत असल्याने शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत लोटला जात आहे.फेब्रुवारी महिन्याच्या अखेर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्ह्यात 8 एप्रिल रोजी सायंकाळपासून मंगळवार, 9 एप्रिल दरम्यान अनेक भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. यात जिल्ह्यातील 80 गावांना फटका बसला आहे. त्यात वाशिम आणि मालेगावात प्रत्येकी 15, रिसोड तालुक्यातील 24, तर मंगरुळपीर तालुक्यातील 26 गावांचा समावेश आहे. यात 3,500 हेक्टरपेक्षा अधिक पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.
उन्हाळी पिकांमध्ये भुईमूग, ज्वारी, सोयाबीन, मूग, तीळ, या पिकांसह संत्री, लिंबू, चिकू, आंबा, केळी, पपई, टरबूज आदी फळपिके तसेच बिजवाईचा कांदा आणि भाजीपालावर्गीय पिके घेतली जातात.या सर्व पिकांपैकी एका उन्हाळी मुंग पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं हाताशी आलेली पिके आपोआप करपून जात आहेत.सध्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे भुईमूग, सोयाबीन, तीळ या पिकांचे उत्पादन समाधानकारक झाले तर चांगला भाव मिळाला असता. परंतू हातातोंडाशी आलेल्या पिकांवर दरवेळी रोगांचे आक्रमण होत आहे. बळीराजाची स्वप्नं प्रत्येकवेळी उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. यावर्षी काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विहिरीत पुरेसं पाणी आहे. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी धरण भरल्यामुळे कालव्यालादेखील नियमित पाणी येत आहे. त्यामुळे बळीराजाने यावर्षी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी पिकाची लागवड केली. मात्र अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने रोगाचा प्रादुर्भाव उन्हाळ्यात वाढला आहे. हे पीक करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे डोळ्यांदेखत करपून जात आहे.त्यामुळे उन्हाळी मूग पिकात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा - भीषण वास्तव, वर्ध्यातील या गावात लग्नासाठी मुली द्यायला पालक का घाबरतात?
करपा रोगाची लागण का होते?
साधारणत: फुलोरा अवस्थेत वातावरण सतत ढगाळ राहिल्यास तसेच नियमित मध्यम ते तुरळक पाऊस राहिल्यास पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होत असतो. रोगग्रस्त रोपांची पाने कडेकडून मध्य शिरेच्या दिशेने करपतात. कालांतराने संपूर्ण पान करपते. सकाळी पानांचे निरीक्षण केले असता पानांच्या खालच्या बाजूला दुधाळ रंगाचे जिवाणूंचे दवबिंदू साचलेले दिसतात.पीक फुलोऱ्यात असताना रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास शेंगातील दाणे काळे पडणे, दाणे कमी भरणे या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.