Toll Fastag Annual Pass: तुम्ही तुमच्या वाहनानं प्रवासाला निघता, तेव्हा वाटेत येणाऱ्या अनेक टोलनाक्यांवर तुम्हाला कर भरावा लागतो. काही शहरांमध्ये हा टोल कर 500 रुपयांपेक्षा जास्त असतो. याचा अर्थ, रोज लांबचा प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हा एक मोठा खर्च आहे, कारण त्यांना वारंवार आपला फास्टॅग रिचार्ज करावा लागतो. हे लक्षात घेऊन, सरकारने आता फास्टॅगचा वार्षिक पास आणला आहे, जो 15 ऑगस्टपासून लागू झाला आहे. एक वर्षासाठी तयार होणाऱ्या या पासबद्दल लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत.
फास्टॅगचा वार्षिक पास काय आहे?
फास्टॅगचा वार्षिक पास हा खासगी वाहनांसाठी (कार आणि इतर खासगी वाहने) तयार केलेला प्रीपेड पास आहे. हा पास 15 ऑगस्टपासून सुरु झाला आहे आणि त्याची किंमत 3,000 रुपये आहे. लोकांच्या खर्चाचा भार कमी करण्यासाठी सरकारने हा पास जारी केला आहे.
हा पास कुठं खरेदी करणार?
तुम्हाला हा वार्षिक पास घ्यायचा असेल, तर तुम्ही तो 'राजमार्ग यात्रा' मोबाइल ॲप किंवा NHAI च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. एकदा तुम्ही तिथे पेमेंट केले की, तुमचा वार्षिक पास सक्रिय होईल.
( नक्की वाचा : FASTag Annual Pass: महाराष्ट्रात कुठे कुठे चालणार फास्टॅग वार्षिक पास? वाचा 'त्या' 96 टोलनाक्यांची यादी )
फास्टॅग पास कसा सक्रिय होईल?
फास्टॅग पास सक्रिय करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या वाहनाची आणि फास्टॅगची पडताळणी करावी लागेल. त्यानंतर 3,000 रुपयांचे पेमेंट करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर, दोन तासांनी तुमचा फास्टॅग सक्रिय होईल आणि तुम्ही तो एक वर्षापर्यंत वापरू शकता.
नवीन फास्टॅग खरेदी करावा लागेल का?
वार्षिक पाससाठी तुम्हाला नवीन फास्टॅग स्टिकर खरेदी करण्याची गरज नाही. तुमच्या सध्याच्या फास्टॅगवरच हा पास सक्रिय होईल. मात्र, त्यासाठी तुमचे KYC पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
कोणत्या टोलनाक्यांवर मोफत प्रवास करता येईल?
फास्टॅगचा हा वार्षिक पास फक्त राष्ट्रीय महामार्ग (National Highways) आणि एक्सप्रेसवेवरील (Expressways) टोलनाक्यांवर वैध असेल. महामार्ग किंवा एक्सप्रेसवे राज्याचा किंवा खासगी असेल, तर तुम्हाला या पासवर मोफत प्रवेश मिळणार नाही.
( नक्की वाचा : PM Viksit Bharat Rojgar Yojana : देशभरातील तरुणांना कसे मिळणार 15 हजार? कुठे करणार अर्ज... वाचा सर्व माहिती )
वार्षिक पासचे फायदे काय आहेत?
- टोल करात पाच ते सात हजार रुपयांची बचत.
- वारंवार टोल देण्यापासून आणि रिचार्ज करण्याच्या त्रासातून मुक्ती.
- राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवेवर न थांबता प्रवास करता येईल.
किती फेऱ्या (trips) करता येतील?
फास्टॅगचा वार्षिक पास सक्रिय झाल्यावर, तो एक वर्षासाठी किंवा 200 फेऱ्या पूर्ण होईपर्यंत वैध राहील. एक वर्ष पूर्ण झाल्यावर किंवा 200 फेऱ्या पूर्ण झाल्यावर, फास्टॅग पुन्हा पूर्वीप्रमाणेच काम करू लागेल. म्हणजे, तुम्हाला बॅलन्स रिचार्ज करावा लागेल. एक टोलनाका ओलांडल्यास एक फेरी (trip) मोजली जाईल. परतीच्या प्रवासासाठी दोन फेऱ्या मोजल्या जातील.
हा पास दुसऱ्या वाहनावर वापरता येईल का?
'एक फास्टॅग एक वाहन' (One FASTag One Vehicle) असे धोरण आहे. म्हणजेच, तुम्ही दुसऱ्याचा फास्टॅग स्टिकर वापरू शकत नाही. हा फास्टॅग पास फक्त त्याच वाहनासाठी वैध असेल, ज्यावर फास्टॅग लावलेला आहे किंवा नोंदणीकृत आहे. दुसऱ्या वाहनावर तो वापरल्यास तो त्वरित काळ्या यादीत (blacklist) टाकला जाईल.
( नक्की वाचा : HSRP Number Plate: 'एचएसआरपी' प्लेट अद्याप बसवली नाही? राज्य सरकारचा मोठा दिलासा, वाचा नवी मुदतवाढ आणि नियम )
कुणाला पास मिळणार नाही?
तुमचा फास्टॅग चेसिस नंबर वापरून नोंदणीकृत झाला असेल, तर तुम्हाला वार्षिक पास मिळू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला वाहन नोंदणी क्रमांक (VRN) अद्ययावत (update) करावा लागेल. त्याचबरोबर, तुमचा मोबाइल नंबरही अद्ययावत असणे आवश्यक आहे. तुम्हाला फास्टॅग पास घ्यायचा नसेल, तर तो घेणे सक्तीचे नाही.