
PM Viksit Bharat Rojgar Yojana: नोकरीच्या शोधात असलेल्या देशभरातील तरुणांना मोदी सरकारनं मोठं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना लागू झाल्याची घोषणा केली आहे. या योजनेमुळे पुढील 2 वर्षांत 3.5 कोटी नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या योजनेअंतर्गत, ज्या तरुणांना पहिली नोकरी लागेल, त्यांना 15 हजार रुपये दिले जातील.
पंतप्रधानांनी ही योजना जाहीर करताच सर्वांमध्येच त्याची उत्सुकता आहे. कोणत्या तरुणांना या योजनेचा लाभ होईल? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? याबाबतची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
पंतप्रधान मोदींनी काय घोषणा केली?
1 जुलै, 2025 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात रोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या या योजनेला मंजुरी दिली होती. ही योजना आता लागू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित भाषण करताना सांगितलं की, "आज 15 ऑगस्ट आहे आणि आम्ही देशातील तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत आहोत. ही तुमच्यासाठी चांगली बातमी आहे की पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना आजपासून लागू होत आहे."
( नक्की वाचा : 79th Independence Day: जीएसटी ते जेट इंजिन... PM मोदींच्या लाल किल्ल्यावरून देशवासियांसाठी 8 मोठ्या घोषणा )
कुणाला मिळणार 15 हजार रुपये?
पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेत खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना 15,000 रुपये मिळतील. याशिवाय, त्यांना रोजगार देणाऱ्या कंपनीलाही सरकारकडून प्रोत्साहन रक्कम दिली जाईल. सुमारे 99,446 कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या योजनेचे उद्दिष्ट 2 वर्षांत 3.5 कोटींहून अधिक नोकऱ्या तयार करणे आहे. यापैकी 1.92 कोटी लाभार्थी पहिल्यांदा नोकरी मिळवणारे असतील.
योजनेची मुदत काय आहे?
या योजनेत फक्त 1 ऑगस्ट 2025 नंतर नोकरी जॉइन केलेल्या तरुणांनाच 15 हजार रुपये दिले जातील. म्हणजेच, जुलैपर्यंत पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ही योजना 31 जुलै 2027 पर्यंतच्या नोकऱ्यांसाठी लागू राहील. त्यामुळे, तुमची नोकरी नुकतीच लागली असेल किंवा लवकरच लागणार असेल, तर तुम्हाला 15 हजार रुपये नक्कीच मिळतील.
( नक्की वाचा : HSRP Number Plate: 'एचएसआरपी' प्लेट अद्याप बसवली नाही? राज्य सरकारचा मोठा दिलासा, वाचा नवी मुदतवाढ आणि नियम )
पगार किती हवा?
या योजनेसाठी किती पगार असलेल्या तरुणांना पात्र मानले जाईल, हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमचा पगार 1 लाख रुपयांपर्यंत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. अशा तरुणांना 15 हजार रुपये किंवा 1 महिन्याचा EPF पगार दिला जाईल. या योजनेला दोन भागांत विभागले गेले आहे. भाग 'अ' मध्ये पहिल्यांदा नोकरी करणारे तरुण समाविष्ट आहेत, तर भाग 'ब' मध्ये नोकरी देणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे.
नोकरी सोडल्यास नुकसान होईल का?
EPFO मध्ये पहिल्यांदा रजिस्टर झालेल्या तरुणांना दोन हप्त्यांमध्ये रक्कम दिली जाईल. ज्यामध्ये, 6 महिने नोकरी केल्यानंतर पहिला हप्ता जारी होईल, तर दुसरा हप्ता 12 महिन्यांच्या नोकरीनंतर मिळेल. म्हणजेच, एक वर्ष नोकरी केल्यानंतर तुम्हाला 15 हजार रुपये मिळतील.
अर्ज कुठे करायचा?
या योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला कुठेही अर्ज करण्याची गरज नाही. तुम्हाला नोकरी मिळाली आणि तुम्ही EPFO मध्ये रजिस्टर झालात, तर तुम्ही आपोआप या योजनेत समाविष्ट व्हाल. याच आधारावर तुम्हाला 15 हजार रुपये दिले जातील.
कंपन्यांना किती पैसे मिळतील?
नोकरी देणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यासाठी (ज्याचा पगार जास्तीत जास्त 1 लाख रुपये असेल आणि ज्याने किमान 6 महिने नोकरी केली असेल) 2 वर्षांपर्यंत 3 हजार रुपये महिन्यापर्यंतचे प्रोत्साहन दिले जाईल. उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रात नोकरी देणाऱ्यांसाठी हे प्रोत्साहन तिसऱ्या आणि चौथ्या वर्षापर्यंतही सुरू राहील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world