महेश झगडे
कोणत्याही समाजाच्या अधोगतीचा एक निश्चित टप्पा असतो, जिथे श्रद्धा आणि शहाणपण यांच्यातील सीमारेषा पूर्णपणे पुसली जाते. आपल्या शहरांच्या रस्त्यांवर, खिडक्यांवर आणि घरांच्या गॅलऱ्यांमध्ये कबुतरांच्या विष्ठेच्या थरात हे स्पष्टपणे दिसते. काही लोक कबुतरांना 'पवित्र' जीव मानतात, पण खरेतर ती रोगांचे वाहक आहेत. काहीजण त्यांना धार्मिकतेचे प्रतीक समजतात, पण आजच्या काळात ती शहरांच्या आरोग्यासाठी मोठा धोका बनली आहेत.
कबुतरांना खाद्य घालण्यावर न्यायालयांनी बंदी घातली आहे, डॉक्टरांनी धोक्याचा इशारा दिला आहे आणि आरोग्य तज्ज्ञांनी यामुळे फुफ्फुसाचे आजार, ॲलर्जी आणि इतर अनेक रोग वाढत असल्याचे सांगितले आहे. तरीही काही लोक धर्म आणि परंपरेच्या नावाखाली रस्त्यावर गहू, बाजरी आणि तांदूळ टाकतात. ही त्यांची श्रद्धा नसून एक प्रकारची हटवादी अंधश्रद्धा आहे, ज्यामुळे आता समाजाचे मोठे नुकसान होत आहे.
श्रद्धा ही वैयक्तिक बाब आहे. पण जेव्हा तुमची श्रद्धा इतरांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते, तेव्हा ती श्रद्धा नसून स्वार्थी हट्ट बनतो. आज अनेक घरांमध्ये श्वसनाचे आजार, खोकला, डोळ्यांची जळजळ आणि ॲलर्जी वाढत आहेत, ज्याचे मुख्य कारण कबुतरांच्या विष्ठेतील सूक्ष्म कण आहेत. हे कण हवेत मिसळून शरीरात प्रवेश करतात आणि आजार निर्माण करतात.
( नक्की वाचा : Dadar Kabutar khana : श्वास घ्यायला त्रास, 10 वर्षांपासून आजारपण, कबुतराच्या एक पिसामुळे मुंबईच्या वनिता सांगडेंचं आयुष्य उद्ध्वस्त )
कबुतरांच्या विष्ठेमुळे इमारतींचे प्लास्टर खराब होते, पाईपलाइन तुंबतात आणि बाल्कनी अस्वच्छ होतात. जेव्हा यावर उपाय करायला जातो, तेव्हा काही लोक 'आमच्या श्रद्धेचा अधिकार आहे' असे म्हणून विरोध करतात. मग, इतरांच्या स्वच्छ वातावरणात श्वास घेण्याच्या अधिकाराचे काय?
शहरांमधील तथाकथित 'कबुतरखाने' हे संसर्गाचे केंद्र बनले आहेत. तिथे हजारो कबुतरे एकत्र येतात, ज्यामुळे रोगांचा प्रसार होतो. विशेष म्हणजे, जे लोक कबुतरांना खाद्य घालतात, ते त्यांना स्पर्श करत नाहीत. ते स्वतःच्या घराच्या खिडक्यांवर आणि गॅलरीत जाळ्या लावतात, पण बाहेर रस्त्यावर मात्र अन्न टाकतात. ही कुठली श्रद्धा? ही तर दांभिकता आहे.
( नक्की वाचा : Pigeon Droppings Diseases : कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे 6 गंभीर आजार; कोणते उपाय करावे? तज्ज्ञांनी दिला महत्त्वपूर्ण सल्ला )
न्यायालयाचे निर्णय, डॉक्टरांचे सल्ले आणि महापालिकेच्या सूचनांना हे लोक 'धर्मद्रोही' ठरवतात. कारण त्यांना त्यांची श्रद्धा विज्ञान, कायदा आणि आरोग्यापेक्षा जास्त महत्त्वाची वाटते. कोणत्याही धार्मिक ग्रंथात कबुतरांमुळे इतरांना त्रास झाला तरी चालेल असे सांगितलेले नाही.
पक्ष्यांना खाऊ घालणे चुकीचे नाही, पण सार्वजनिक आरोग्याची हानी होईल अशा पद्धतीने हे करणे चुकीचे आहे. ज्यांना अन्नदान करायचे आहे त्यांनी शहराबाहेर किंवा नियोजित पक्षी-आहार केंद्रांमध्ये योग्य पद्धतीने करावे. घरांच्या खिडक्या, रहिवासी संकुल किंवा रुग्णालयांच्या बाहेर कबुतरांना अन्न देणे हे जनतेच्या आरोग्याशी खेळण्यासारखे आहे.
श्रद्धेचा उपयोग माणसाला उन्नत करण्यासाठी झाला पाहिजे, त्याच्या श्वासाला गुदमरवा यासाठी नाही. कबुतरांना खाद्य घालण्याचा हट्ट हा श्रद्धेचा नव्हे, तर समाजघातक अंधश्रद्धेचा मुद्दा आहे. ही गोष्ट थांबली पाहिजे. नाहीतर आपल्या शहरे भविष्यात पवित्र मंदिरांसारखे नाही तर स्मशानासारखी होतील. चला, या अंधश्रद्धेचे पंख छाटूया, अन्यथा उद्या श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा शिल्लक राहणार नाही.
(लेखक माजी सनदी अधिकारी आहेत.)