- इराण, इस्त्रायल आणि अमेरिकामधील युद्धामुळे तेल पुरवठ्यावर परिणाम होऊन पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत
- डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे मत्स्य व्यवसायावर थेट परिणाम होऊन मासेमारी कमी झाली आहे
- मुंबईत माशांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून पापलेट व सुरमई यांचे दर विशेषतः वाढले आहेत
इराण इस्त्रायल अमेरिका युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. त्याच परिणाम तेल पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती ही वाढत चालल्या आहेत. पेट्रोल डिझेल वाढल्याने त्याच्यावर अवलंबून असलेले उद्योग व्यवसाय ही अडचणीत सापडले आहेत. त्या पैकीच एक मत्स्य व्यवसाय आहे. डिझेलचे दर वाढल्याने त्याचा थेट परिणाम मासेमारीवर ही झाला आहे. शिवाय मासे महाग ही झाले आहेत. माशांचे सध्याचे दर पाहाता ते सर्व सामान्यांच्या आवाक्या बाहेर चालले आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.
तुम्ही जर मासे खायचा विचार करत असाल तर मात्र तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण मुंबईत मासे महागले आहेत. 200 रुपयांपासून ते साडेतीनशे रुपयांपर्यंत प्रतिकिलो दर वाढलेले आहेत. मुंबईत पापलेटचा दर बाराशे रुपये झाला आहे. तर सुरमई हजार रुपयांना मिळत आहे. युद्ध आणि डिझेलचे वाढलेले दर याचा मोठा परिणाम माशांच्या दरावर जाणवत आहे. समुद्रात मासेमारी करण्यासाठी बल्क वर्गातलं डिझेल लागतं. हे डिझेल आधी 70 रुपये प्रतिलिटर होतं. मात्र युद्धा मुळे ते आता 144 रुपये प्रति लीटर झालं आहे.
म्हणजे जवळपास दुप्पट दर डिझेलचे झाले आहेत. अशा स्थितीत मोठ्या बोटी बंदरांवर थांबून आहेत. त्यांना समुद्रात ऐवढं महागाचं डिझेल घेवून मासेमारी करणे परवडणारे नाही. त्यामुळे त्यांनी मासेमारी बंद ठेवली आहे. काही मोजक्या बोटी मासेमारीसाठी जात आहे. अशा स्थितीत माशांची आवक ही घटली आहे. त्याचा थेट परिणाम माशांच्या दरावर झाला आहे. प्रत्येक माशांचे दर हे वाढले आहेत. मुंबईत पापलेट 1,200 रुपयांवर गेलं आहे. सुरमईही महाग झाली आहे. तिने पण हजारचा आकडा गाठला आहे. डिझेलचे दर वाढल्याचा हा परिणाम असल्याचं बोललं जात आहे.
मासे महागले
आधी आता
- पापलेट 850 रु. 1,200 रु.
- सुरमई 700 रु. 1,000 रु.
- रावस 500 रु. 700 रु.
- हलवा 600 रु. 850 रु.