लोककलावंतांची स्थिती वाईट झाली आहे. कलाकेंद्रातून सध्या ढोलकी, पेटी, तबला, घुंगरू गायब होत आहे. डीजेचा धुमाकूळ तिथे होत आहे. त्यामुळे लावणी क्षेत्रातील कलाकार मात्र देशोधडीला लागत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील कलावंतांच्या संघटनेनं पुढाकार घेतला आहे. शिवाय काही धक्कादायक गोष्टी ही त्यांनी समोर आणल्या आहेत. त्यामुळे सरकारलाही त्याचा गंभीर पणे विचार करावा लागेल असं लोककलाकारांचे म्हणणे आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आर. आर. पाटील हे जेव्हा गृहमंत्री होते, तेंव्हा डान्स बारवर बंदी आणली होती. त्यानंतर हे डान्सबारचे लोन महाराष्ट्रातल्या कलाकेंद्रावर पोहोचले. ते आता इतके पसरले आहे की त्याचा फटका मात्र लोककलाकारांना बसत आहे, असा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केला आहे. महाराष्ट्रातील कलावंतांच्या संघटनेनेनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही धक्कादायक खुलासेही केले आहेत.
अनेक कला केंद्रांवर सध्या लावणी ऐवजी डीजे लावून डान्सबार सुरू असल्याचा धक्कादायक आरोप सुरेखा पुणेकर यांनी केला आहे. शिवाय काही व्हिडिओ क्लिप दाखवून खळबळ उडवून दिली आहे. डीजेमुळे ढोलकी, पेटी, तबला कलाकार हे उपाशी मरत आहे. शिवाय लावणी कलाकारां ऐवजी डान्सबारमध्ये नाचणाऱ्यामुळे लावणीच्या नावाखाली डीजेवर धुमाकूळ घालत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे. काही कलाकारांनी काम नसल्याने आत्महत्या ही केल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
काही कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. डीजेवर सध्या कार्यक्रम होत असल्याने खरी कला मात्र नष्ठ होत आहे. संगितबारी संपत चालली आहे. संगीतबारीला वेगळं वळण लागलं आहे. कलावंत डीजेमुळे बेकार झाले आहेत. तबला, पेटी, ढोलकी आता बंद पडली आहे. त्यामुळे या कलावंताना न्याय मिळाला पाहीजे असंही त्या म्हणाल्या. कलाकारांसाठी जामखेड, बीजमध्ये उपोषण ही करण्यात आलं. पण त्याचा काही एक फायदा झाला नाही.
सरकार दरबारी ही आम्ही सर्व कलाकार गेलो होतो. पण न्याय काही मिळाला नाही. आम्ही वारंवार सरकारच्या दरबारी जाऊ, आता तर मंत्रालया समोर उपोषणाला बसण्याचा इशारा सुरेखा पुणेकर यांनी दिला आहे. अनेक थिएटरमध्ये सर्रास पणे डीजे लावले जाते. त्याच्यावर बंदी घालावी. ज्या थिएटरमध्ये डीजे लावला जाईल त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल असा निर्णय सरकारने घ्यावा अशी मागणी ही त्यांनी या निमित्ताने केली. जोपर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत संघर्ष करत राहू असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.