Lionel Messi in Mumbai : फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर आहे. कोलकातामध्ये मेस्सीचे भव्य स्वागत झाले. सॉल्ट लेक स्टेडियममध्ये त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती, मात्र मेस्सी अवघ्या काही मिनिटातच स्टेडियममधून निघून गेल्याने चाहत्यांचा संताप अनावर झाला. मेस्सीच्या चाहत्यांनी मैदानावर धुडगूस घातला असून खुर्च्या, पाण्याच्या बॉटल्स फेकल्या तसेच होर्डिंग्स फाडत साहित्याचे नुकसान केले. त्यानंतर आज मेस्सी मुंबई दौऱ्यावर आहेत. मुंबईत कोलकाताची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे.
कोलकातासारखी घटना मुंबईत होऊ नये यासाठी वानखेडे स्टेडियमच्या बाहेर मुंबई पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. फुटबॉल विश्वातील महान खेळाडू लिओनेल मेस्सी भारतीय दौऱ्यावर असल्यामुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आज फुटबॉल विश्वतील महान खेळाडू लिओनेल मेस्सी संध्याकाळी ५.३० वाजता वानखेडे स्टेडियमवर उपस्थित राहणार आहे. कोलकातासारखी घटना मुंबईत होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून कडेकोट सुरक्षा लिओनेल मेस्सी आणि वानखेडे स्टेडियममध्ये वाढण्यात आली आहे.
मेस्सीच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः चर्चगेट आणि मरीन ड्राईव्ह परिसरातील अनेक महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत, तसेच पार्किंगवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. प्रवाशांनी गैरसोयीपासून वाचण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.