प्रसाद पाटील, प्रतिनिधी
Raigad Fort South Area Fire Incident : स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या दक्षिण भागाला चार दिवसांपूर्वी भीषण वणवा लागल्याची घटना नुकतीच व्हायरल व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आली आहे. या वणव्याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये तीव्र भावना व्यक्त केल्या जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,वाघोली हद्दीतील दरीत लागलेला हा वणवा पुढे रायगडाच्या दक्षिणेकडील डोंगर उतारावर पोहोचला.पुढे तो भवानी टोक,काळा हौद परिसरापर्यंत पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.रात्रीच्या अंधारात डोंगर उतारावर धगधगणाऱ्या आगीचे दृश्य अत्यंत भयानक दिसत होते.
वणवा विझवण्यासाठी धनगर बांधवांचे शर्थीचे प्रयत्न
इतिहासातील “पोटल्याच्या डोंगरावरून रायगडावर तोफांचा मारा झाला आणि किल्ला पडला” या घटनेची आठवण करून देणारे हे दृश्य असल्याची प्रतिक्रिया अनेक शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे.इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान,रायगड किल्ल्यावर राहणारे धनगर बांधव आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचारी यांनी प्रसंगावधान राखत तातडीने वणवा विझवण्यासाठी प्रयत्न केले.
नक्की वाचा >> Pune News: पुणे-नाशिक महामार्गावर 'या' ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी, 4 किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा, Video
त्यांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे अखेर हा वणवा आटोक्यात आणण्यात यश आले.सुदैवाने या आगीत किल्ल्यावर असलेल्या कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचे नुकसान झाले नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.मात्र या घटनेमुळे रायगड परिसरातील वनसंवर्धन आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.