Ahilyanagar News : खंडाळा परिसरात नागरिकांची धडधड वाढली, 15 दिवसांपासून मानवी वस्तीत सुरु होता भयानक प्रकार

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा परिसरात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत चौथा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Leopards In Ahilyangar Shrirampur

सुनिल दवंगे, प्रतिनिधी 

Leopards In Shrirampur : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा परिसरात बिबट्यांची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीत चौथा बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असल्याने शेतकरी,ऊसतोड मजूर आणि ग्रामस्थांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.विशेषतः रात्रीच्या वेळी गावाबाहेर जाण्यास नागरिक धजावत नसल्याचे चित्र आहे.

खंडाळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार सुरू असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. शेतामध्ये,उसाच्या फडांमध्ये तसेच वस्ती परिसरात बिबट्या दिसत असल्याने नागरिकांनी वनविभागाकडे तक्रारींचा पाऊस पाडला होता.त्यानंतर वनविभागाने गीताराम ढोकचौळे यांच्या शेतात पिंजरा लावला होता.अखेर या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला आणि वनविभागाने त्याला जेरबंद करण्यात यश मिळवले.

Advertisement

मात्र,ही घटना एकटी नाही.गेल्या पंधरा दिवसांत याच परिसरातून तब्बल चार बिबटे पकडण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये भीती अधिकच वाढली आहे.“एक पकडला की दुसरा दिसतो,”अशी भावना आता स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतात काम करणे,रात्री जनावरांना चारण्यासाठी नेणे किंवा गावाबाहेर फिरणे धोकादायक बनले आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते,खंडाळा आणि परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्यांना नैसर्गिक आश्रय मिळत आहे.ऊसाच्या दाट शेतांमध्ये बिबटे सहज लपून राहतात.अन्नासाठी कुत्री,शेळ्या,डुकरे तसेच लहान जनावरांची शिकार करत ते गावाच्या दिशेने येतात.उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधातही वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

नक्की वाचा >>Engineering साठी भारताचे टॉप-10 कॉलेज, 12 वी नंतर 'असं' मिळेल अ‍ॅडमिशन, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस एका क्लिकवर

परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की,बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत.नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे,रात्री एकटे बाहेर पडू नये आणि लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये,असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान,पकडण्यात आलेले बिबटे पुन्हा याच परिसरात सोडले जात असल्याचा संशय काही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. “वारंवार त्याच भागात बिबटे कसे दिसतात?”असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.वनविभागाने मात्र हे आरोप फेटाळून लावत नियमांनुसारच बिबट्यांचे पुनर्वसन केले जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement

अहिल्यानगर जिल्ह्यात यापूर्वीही बिबट्यांच्या हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या आहेत.काही महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागाने मोठी मोहीम राबवून नरभक्षक बिबट्याला ठार केले होते. त्यावेळी 100 हून अधिक वन कर्मचारी,ड्रोन कॅमेरे आणि विशेष पथके तैनात करण्यात आली होती.तसेच श्रीरामपूर परिसरात बिबट्यांचा वाढता वावर असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.परिसरात पिंजरे लावल्यानंतर काही दिवसांतच बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले होते.  

नक्की वाचा >> वांद्र्यात अवैध वस्ती वाचवण्यासाठी पोलिसांवर थेट हल्ला, जमावाला पांगवण्यासाठी पोलीस आक्रमक, नेमकं काय घडतंय?

ऊस पट्ट्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढली

वन्यजीव अभ्यासकांच्या मते,महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मानवी वस्ती आणि बिबट्यांचा अधिवास यामधील संघर्ष वाढत चालला आहे.विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील ऊस पट्ट्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते. उसाचे शेत हे बिबट्यांसाठी सुरक्षित निवारा ठरत असल्याने ते कायमस्वरूपी त्या परिसरात वास्तव्य करू लागतात.नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत अनेक बिबटे पकडण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत.  

Advertisement

तज्ज्ञांच्या माहितीनुसार,बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी केवळ पकडून स्थलांतर करणे हा कायमस्वरूपी उपाय ठरत नाही.मानवी वस्तीजवळील कचरा,भटकी कुत्री आणि असुरक्षित पशुधन यामुळे बिबटे वारंवार गावांकडे आकर्षित होतात. त्यामुळे ग्रामस्थांनीही काही खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते.खंडाळा परिसरातील ग्रामस्थांनी आता वनविभागाकडे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.“आमच्या मुलांच्या जीविताचा प्रश्न आहे.रात्री गावात भीतीचे वातावरण असते.

वनविभागाने फक्त पिंजरे लावून चालणार नाही,तर या भागाला बिबटेमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत,”अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.सध्या वनविभागाने परिसरात गस्त वाढवली असून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.मात्र,चौथा बिबट्या जेरबंद झाल्यानंतरही परिसरातील भीतीचे सावट कायम असल्याचे वास्तव आहे.गावकरी आता वनविभागाच्या पुढील कारवाईकडे लक्ष लावून बसले आहेत.