Ganesh Visarjan Lalbaugcha Raja: मुंबईतच काय पण देशभरात गणेश भक्त ज्याचं दर्शन घेण्यासाठी आतूर असतात अशा लालबागच्या राजाला मंडपापासून गिरगाव चौपाटीपर्यंत पोहोचण्यासाठी साधारण 20 तासांचा वेळ लागतो. यंदा समुद्राच्या भरतीच्या कारणामुळे 24 तासांहून अधिक कालावधी लागला आहे. लालबाग ते चौपाटीपर्यंतचं अंतर केवळ 8 किलोमीटरचं आहे. 8 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी लालबागच्या राजाला 20 तासांचा वेळ लागतो. लालबागहून सकाळी 10 वाजता प्रवासाला सुरुवात होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत बाप्पाचं विसर्जन होतं. त्यांच्या मिरवणुकीत लाखो भक्त सामील होतात. बाप्पाच्या विसर्जन मार्गातही मोठी गर्दी होते.
5 परंपरा ज्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाला 20 तासांचा वेळ लागतो
1 शेजारच्या गणपतीनंतर प्रस्थान
जेव्हा लालबागच्या राजाचा रथ त्याच्या मंडपातून बाहेर पडतो. तेव्हा रस्त्यालगतच्या मुख्य प्रवेशद्वारावरच त्याला तब्बल दोन तास ढोलताशा, नृत्य आणि गुलालाच्या वर्षावात निरोप दिला जातो. परंपरेनुसार, लालबागच्या राजाला मंडपातून काढण्यापूर्वी, शेजारच्या मंडळाचा गणेश गल्लीचा गणपती बाहेर येतो. असे मानले जाते की गणेश गल्लीच्या गणपतीने लालबागच्या मच्छिमारांची एक इच्छा पूर्ण केली होती आणि त्यानंतर लालबागचा राजा गणेश उत्सवाची सुरुवात झाली. म्हणूनच, या दोन्ही मंडळांमध्ये एक खास नातं आहे.
2 परिसरातून मिरवणूक
मंडपातून बाहेर आल्यानंतर लालबागचा राजाची पुढील तीन ते चार तासांपर्यंत परिसरात मिरवणूक काढली जाते. यानंतर भायखळ्याच्या रस्त्याने गिरगाव चौपाटीसाठी मार्गस्थ होते. रात्रभर ठिकठिकाणे गणेशभक्त त्याची प्रतीक्षा करीत असतात. अनेक ठिकाणी मोठमोठ्या फुलांच्या हारांनी बाप्पाचं स्वागत केलं जातं. ठिकठिकाणी भक्त बाप्पाची एक झलक पाहण्यासाठी कुणी दुकानावर, छतावर तासन् तास उभे असतात.
3 मुसलमान करतात स्वागत
लालबागच्या राजाशी संबंधित अनेक रंजक कहाणी आहेत. दोन ठिकाणी मुस्लीम समुदायाकडून बाप्पाचं आणि त्यांच्या भक्ताचं स्वागत केलं जातं. भायखळा स्टेशनजवळ हिंदुस्ताी मशिदीजवळ पोहोचल्यानंतर मुस्लीम समुदायाकडून मिठाई वाटली जाते. यानंतर राजा जेव्हा दोन टाकी या मुस्लीम बहुल भागात पोहोचतो, तेव्हा मुस्लीम समुदायाकडून भक्तांना शाही सरबत दिला जातो.
4. फायर ब्रिगेडशी अनोखं नातं
हिंदुस्तानी मशिदीतून लालबागचा राजा मार्गस्थ होतो तेव्हा एक अनोखी परंपरा पाहायला मिळते. जेव्हा राजाची मिरवणूक मुंबई फायर ब्रिगेडच्या मुख्यालयाच्या समोरून जाते, तेव्हा तेथे उभ्या असलेल्या फायर इंजिन सायरन वाजू लागतात आणि लाल दिवे लावुन राजाला सलामी दिली जाते. लालबागच्या राजाची मिरवणूक जात नाही तोपर्यंत सायरन आणि दिवे सुरू राहतात.
5. मच्छिमार देतात निरोप
मुंबईतील जुन्या रस्त्यांवरुन जात असताना लालबागच्या राजाची मिरवणूक संथ गतीने पुढे जात असतात. सकाळी ६ वाजता गिरगाव चौपाटीवर पोहोचल्यानंतर कोळी समुदाय आपल्या बोटींमध्ये रंग-बिरंगी झेंडे लावून लालबागच्या राजाला भव्य सलामी देतात. यानंतर मूर्तीला खोल पाण्यात घेऊन जात विसर्जन केले जाते.