संजय तिवारी, प्रतिनिधी
विदर्भात संत्र्याची लागवड कमी होत आहे, अशी ओरड सध्या केली जात आहे. बांगलादेशने आयात शुल्कात केलेल्या भरमसाठ वाढीमुळे विदर्भातील संत्री निर्यात होण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. भाव आणि उठाव दोन्ही नसल्याने संत्रा उत्पादक हताश आहे. या उत्पादकांसाठी एक चांगली बातमी आहे. त्याचा फायदा विदर्भासह मध्य भारतामधील संत्रा उत्पादकांना होणार आहे.
संत्रा उत्पादकांना चांगला भाव आणि संत्र्याला उठाव मिळावा यासाठी महत्वाचा असलेला पतंजली चा संत्रा प्रक्रिया प्रकल्प लवकरच नागपूर नजिकच्या मिहान परिसरात सुरू होणार आहे. सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांनी शनिवारी निवडक शेतकऱ्यांसोबत या प्रकल्पाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी NDTV मराठी सोबत बोलताना सांगितले की, 'येथे संत्रा, मोसंबी आणि निंबू फळांचे ज्यूस extraction होणार आहे. दररोज 800 मेट्रिक टन संत्र्याची मागणी असेल तसेच संत्र्यातून ज्यूस शिवाय विविध प्रकारचे तेल, द्रव्य, सालीची पावडर अशी सहा उत्पादने घेण्यात येतील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विदर्भातील संत्र्याची चव थोडी चुरट आणि कडू असल्याची काही वेळ तक्रार करण्यात येते. मात्र, या प्रकल्पात तयार ज्यूस मध्ये चव सुधारणा देखील करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे या प्रकल्पामुळे बाजारात कसलीच मागणी नसलेल्या निकृष्ट दर्जाच्या संत्र्याला देखील आता भाव मिळेल,' अशी आशा देशमुख यांनी बोलून दाखवली.
येत्या 9 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपुरात या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. नागपूरच्या मिहानमधील पतंजलि फूड अँड हर्बल पार्कची अंदाजित एकूण किंमत 700 कोटी रुपये आहे. एकूण जागा 234 एकर जागेत हा प्रकल्प होत आहे. या प्रकल्पात सध्या पतंजली आटा आणि बिस्किट्स तयार केले जाता आहेत.
( नक्की वाचा : Saffron farming: संत्र्यांच्या नागपुरात चार भिंतीत आता केसर शेती, हा करिश्मा कसा झाला? )
उष्ण कटिबंधीय ट्रॉपिकल फळे म्हणजे आंबा, डाळिंब, अलो व्हेरा इत्यादीचे सुद्धा ज्यूस काढले जाणार असल्याने हा प्रकल्प वर्षभर सुरू राहील आणि लाभाचा ठरेल अशी योजना करण्यात आली असल्याचं पतंजलीच्या एस के राणा यांनी सांगितलं
पतंजली चे यशपाल आर्य यांनी सांगितले की, '2016-17 मध्ये प्रकल्पाची घोषणा झाल्यानंतर आम्ही सर्व प्रतिकूल परिस्थितींवर मात देत हा प्रकल्प पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. येथे स्थानिक सर्व पाले भाज्या आणि फळांवर प्रक्रिया करण्यात येईल. तसेच आज उभारण्यात आला आहे त्यापेक्षा कितीतरी पट मोठा हा प्रकल्प दिसेल. स्वामी रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांना विदर्भातील शेतकऱ्यांना आर्थिक सुस्थितीत पहायचे आहे,' असा दावा त्यांनी केला.