Matheran Mini Train will start : मुंबई आणि पुण्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेलं माथेरान हे अनेकांच्या आवडीचं ठिकाण. माथेरान हे पर्यटन स्थळ मुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असल्याने विकेंडला येथे मोठी गर्दी पाहायला मिळते. निसर्गाबरोबरच येथील मिनी ट्रेन हे लहानग्यांचं खास आकर्षण. मात्र पावसाळ्यात ही ट्रेन बंद असते आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू होते. मात्र यंदा पावसाळा लांबल्यामुळे मिनी ट्रेन सुरू होण्याचा मुहूर्तही लांबला. यंदा मिनी ट्रेन सुरू होण्यासाठी एक महिन्याचा विलंब झाला आहे.
आता १ नोव्हेंबरपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेनला सुरुवात होणार अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे नोव्हेंबरपासून माथेरानमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. माथेरानमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मिनी ट्रेनच्या मार्गावर अनेक ठिकाणी माती वाहून गेली आहे. कड्यावरचा गणपती भागामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅकखाली भागात सुरक्षा भिंत उभारण्याचं काम सुरू आहे. अचानक येत असलेल्या पावसामुळे कामाचा वेग मंदावला आहे. मात्र लवकरच याचं काम पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे.
माथेरानची ऐतिहासिक परंपरा...
१९०७ साली ब्रिटीश काळात सर आदमजी पिरभाय यांनी माथेरानात मिनी ट्रेन सुरू केली. दरवर्षी १४ जून रोजी पावसाळ्यात ट्रेन बंद केली जाते. आणि साधारण दसऱ्यात सुरू होते. मात्र यंदा उशीरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे मिनी ट्रेन सुरू व्हायला तब्बल एक महिना उशीर झाला.