हवामान विभागाकडून अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे राज्यातील मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे कोकणात मात्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक सजग राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
कोकणातील पूर्वेकडील अनेक भागात उष्णतेची लाट पसरली आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी नागरिकांनी मुंबई-पुण्याजवळील थंड हवेच्या ठिकाणांची वाट धरली होती. मात्र येथे त्यांना हिरमोड सहन करावा लागला. महाबळेश्वर आणि माथेरानमध्ये शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी उकाडा वाढल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखलं जाणारं माथेरानचं तापमान रविवारी मुंबईपेक्षाही अधिक होतं. तर रायगडमधील हिल स्टेशनवर 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं. रविवारी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्येही 34.1 अंश तापमान नोंदविण्यात आलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नक्की वाचा - देशाला Heat wave चा धोका; काय काळजी घ्याल? एका क्लिकमध्ये समजून घ्या!
मुंबईला यलो अलर्ट...
येत्या दोन दिवसात मुंबईतील तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला असून आज आणि उद्या मुंबईतील तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. रविवारी मुंबई उपनगरातील अनेक भागात उन्हाचा पारा चाळीशीपार गेला होता.
काय काळजी घ्याल?
- तहान लागली नसली तरीही पाणी पित राहा.
- प्रवासादरम्यान पिण्याचं पाणी सोबत ठेवा.
- ORS चं पाणी प्या, लिंबू पाणी, ताक-लस्सी, फळांचा रस, नारळाचं पाणी यांसारख्या पेयांचं आहारातील प्रमाण वाढवा.
- पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे वापरा.
- थेट सुर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर साधनांचा वापर करा.
- उन्हात बाहेर जाताना चप्पल वा शूज वापरा.
- भारतीय हवामान विभागाचे संकेतस्थळ https://mausam.imd.gov.in/ येथून हवामानाची अद्ययावत माहिती घ्या.
- थेट सुर्यप्रकाशाच्या लाटा रोखण्यासाठी दिवसा खिडक्यांवर पडदे लावा.
- घराबाहेर कामे शक्यतो सकाळ किंवा सायंकाळी उरकून घ्या. आवश्यकता नसेल तर दुपारी घराबाहेर जाणं टाळा.