मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मध्य रात्रीपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या 3 ते 4 तासांत मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात सर्वत्र ढगाळ वातावरण राहणार असून सर्वत्र पावसाच्या सरींची शक्यता आहे.
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमधील ठिकाणे मध्य स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील 8 दिवस चांगल्या पावसाचा अंदाज आहे. आजपासून कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तळकोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापुरातील घाट परिसरात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भात नागपूरसह विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि अमरावती या सात जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देऊळगाव राजा या ठिकाणी 0.2 मिमी नोंद करण्यात आली.