लक्ष्मी रस्ता येथील महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या हुजूरपागा मुलींच्या शाळेत ईद-ए-मिलाद उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी शाळेतील छोट्या मुलींना मुंशी प्रेमचंद लिखित 'ईदगाह' (Hujurpaga Girls School Pune) कथा नाट्यरुपात सादर करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सविता अनकाईकर यांनी यांनी सर्व धर्म समभाव रुजविण्याच्या हेतूने आणि विद्यार्थिनींमध्ये ऐक्याची भावना निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असलं तरी त्यावरुन मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी या कार्यक्रमाचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी शाळेत आयोजित केलेल्या ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. काही हिंदुत्ववादी संघटनांनी 22 सप्टेंबर रोजी शाळेच्या गेटवर जय श्री रामच्या घोषणा दिल्या. तर शाळेत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामुळे हिंदू धर्माला धोका निर्माण झाला आहे का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
हुजूरपागा शाळेचा इतिहास...
रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शंकर पांडुरंग पंडित, वामन आबाजी मोडक या मान्यवरांनी स्त्रीशिक्षणाची गरज ओळखून एकत्र येऊन 29 सप्टेंबर 1884 रोजी हायस्कूल फॉर नेटिव्ह गर्ल्स या संस्थेची स्थापना केली. 18 विद्यार्थिंनीसह सुरू झालेली ही शाळा आज हुजूरपागा म्हणून ओळखली जाते. हुजूरपागा ही पेशव्यांच्या काळातील सर्वात मोठी घोड्यांची पागा होती.
हुजूर हा एक पारसी शब्द आहे. जो खास व्यक्तींचा उल्लेख करताना वापरला जातो. या व्यक्तींच्या घोडेस्वाराला किंवा रक्षक दलाला हुजुरात म्हटले जाते. त्यावेळी शनिवारवाड्यातील जागा पुरेशी नव्हती. म्हणून शनिवारवाड्यापासून काही अंतरावर हुजरातीच्या पागेसाठी एक मोकळी जागा निवडण्यात आली. हुजरातीची पागा म्हणून ही जागा हुजूरपागा या नावाने ओळखली जाऊ लागली. पुढे येथे मुलींची शाळा सुरू झाली. या शाळेचं नाव हायस्कूल फॉर नेटिव्ह गर्ल्स असलं तर पूर्वापार सुरू असलेल्या नावामुळे आजही ही शाळा हुजूरपागा नावाने ओळखली जाते. शांता शेळके, रिमा लागू यांसारख्या अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांनी हुजूरपागा या शाळेत शिक्षण घेतलं आहे.