जेवायला गेले अन् थेट नियमच बदलले! Tukaram Mundhe यांच्या एका अनुभवामुळे हॉटेल चालकांचे धाबे कसे दणाणले?

IAS Tukaram Mundhe: हॉटेल्सच्या या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी थेट आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दणका दिला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
IAS Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयाचा फायदा सर्व ग्राहकांना होणार आहे.
मुंबई:

IAS Tukaram Mundhe News: तुम्ही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेल्यानंतर तिथला वेटर सर्वात आधी तुमच्या टेबलावर येतो आणि विचारतो, "सर, रेग्युलर वॉटर की मिनरल वॉटर?" पण आता यापुढे महाराष्ट्रातील कोणत्याही हॉटेलमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाणार नाही. हॉटेल चालकांकडून ग्राहकांना महागडे बाटलीबंद पाणी घेण्याची एकप्रकारे सक्तीच केली जात असल्याच्या तक्रारींनंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) यावर अत्यंत कडक पावले उचलली आहेत. 

हॉटेल्सच्या या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी थेट आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनीच मैदानात उतरून एक असा दणका दिला आहे, ज्यामुळे संपूर्ण राज्यातील हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisement

मुंढे यांच्या एका अनुभवामुळे आदेश जारी

एफडीएचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतः घेतलेल्या एका अनुभवानंतर हे कडक आदेश जारी केले आहेत. काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे त्यांच्या मित्रांसोबत एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते. एक जबाबदार अधिकारी म्हणून 24 तास सतर्क राहण्याच्या त्यांच्या सवयीमुळे, त्यांनी तिथे गेल्यानंतर हॉटेलमधील काही त्रुटी हेरल्या.

हॉटेलमध्ये प्रवेश करताच त्यांना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले, ज्यामध्ये ग्राहकांना मोफत पाणी देण्याऐ्वजी थेट पाण्याच्या प्रकाराबाबत विचारणा केली जात होती. हा प्रकार अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणारा असल्याने त्यांनी तत्काळ संपूर्ण राज्यासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या. 'NDTV प्रॉफिट' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी ही माहिती दिली.

( नक्की वाचा : Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील तब्बल 101 शाळांना थेट रविवारपर्यंत सुट्टी जाहीर, काय आहे कारण? )

पाण्याचा प्रकार विचारण्यास सक्त मनाई

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आदेश दिले आहेत की, कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकाला सुरुवातीलाच तुम्हाला कोणते पाणी हवे आहे, असा प्रश्न विचारू शकत नाही. ग्राहकाला बसल्या बसल्या सर्वप्रथम पिण्यासाठी शुद्ध आणि मोफत पाणी दिलेच पाहिजे. त्यानंतर जर ग्राहकाची स्वतःची इच्छा असेल, तरच त्याला पॅकेज्ड किंवा बाटलीबंद पाणी दिले जाऊ शकते. 

अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) 2017 मध्येच हा नियम स्पष्ट केला होता की, सर्व खाद्य व्यवसाय चालकांनी ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे आणि बाटलीबंद पाणी हा केवळ एक पर्याय असू शकतो, सक्ती नाही.

Advertisement

( नक्की वाचा : Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची विकेट काढायला गोळा केले 250 कोटी! धक्कादायक आरोपाने विधानसभा हादरली )

हॉटेलच्या प्रवेशद्वारावर परवाना लावणे बंधनकारक

तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या भेटीदरम्यान दुसरी एक मोठी त्रुटी शोधून काढली. हॉटेल कितीही मोठे किंवा लहान असले, तरी त्याच्या प्रवेशद्वारावर अन्न व्यवसायाचा परवाना (Licence) लावणे बंधनकारक आहे, जेणेकरून तो ग्राहकांना सहज दिसेल. मात्र, अनेक हॉटेल्स या नियमाचे पालन करत नसल्याचे समोर आले आहे. मुंढे यांच्या भेटीनंतर 24 तासांच्या आत एफडीएच्या पथकाने त्या विशिष्ट रेस्टॉरंटची तपासणी केली. या कारवाईचा भाग म्हणून आता राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससाठी 22 अस्तित्वात असलेल्या अन्न नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, ज्यामध्ये किचनमधील अन्न साठवणूक आणि स्वच्छतेचा समावेश आहे.

नियम मोडल्यास थेट जन्मठेपेची तरतूद

अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करून जर ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असेल, तर अशा हॉटेल्सचा परवाना तातडीने निलंबित केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. अन्न असुरक्षित किंवा आरोग्यास घातक आढळल्यास थेट जन्मठेपेची शिक्षा देखील होऊ शकते, अशी तरतूद कायद्यात आहे. 

Advertisement

 राज्यात सध्या 11 लाखांपेक्षा जास्त नोंदणीकृत अन्न व्यवसाय चालक आहेत, ज्यापैकी 4 लाखांहून अधिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. आम्ही कोणाचीही गय न करता आणि कोणत्याही दबावाला बळी न पडता या नियमांची निष्पक्षपणे अंमलबजावणी करणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांनी घाबरण्याचे कारण नाही, मात्र नियम मोडणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे मुंढे यांनी सांगितले. 

Topics mentioned in this article