Tukaram Mundhe News: राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एका अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग लॉबीकडून तब्बल 250 कोटी रुपये गोळा करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट सभागृहात केला आहे.
मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून औषध आणि खाद्यपदार्थ क्षेत्रातील माफियांचे धाबे दणाणले असून त्यांची विकेट काढण्यासाठी ही मोठी सुपारी घेण्यात आल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात आणि प्रशासकीय यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले आव्हाड?
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत बोलताना सरकारला आणि यंत्रणेला थेट जाब विचारला. तुकाराम मुंढे यांच्या पाठीमागे ड्रग्ज लॉबी, बड्या मेडिकल कंपन्या आणि काही भ्रष्ट अधिकारी हात धुवून लागले आहेत. या सर्वांनी मिळून मुंढे यांच्या बदलीसाठी 250 कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे. महाराष्ट्रात गुटखा राजरोसपणे कसा फिरतो, असा सवाल करत आव्हाड यांनी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत लॉबीवर हल्ला चढवला.
तपासणीसाठी पाठवलेले अन्न आणि औषधांचे नमुने लॅबमध्ये गेले की फेल केले जातात आणि तिथेच सेटलमेंट होते, असा गंभीर आरोप त्यांनी केला. बाजारातील या भेसळीमुळेच नागरिकांमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे ते म्हणाले.
( नक्की वाचा : Kalyan News : 2 ते 3 महिनेच चालेल असं म्हणत तुकाराम मुंढेंना धमकावलं; कल्याण पोलिसांनी 4 तासातच जिरवली मस्ती )
पुढच्या सोमवारी मोठा गौप्यस्फोट करणार
या संपूर्ण रॅकेटमध्ये नेमके कोणकोणते बडे चेहरे सामील आहेत, याचा पर्दाफाश मी स्वतः पुढील आठवड्यात सोमवारी नावानिशी करणार आहे, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला. अन्न व औषध प्रशासन विभाग सध्या मंत्री नरहरी झिरवाळ चालवत नसून पडद्यामागून दुसरीच कोणतीतरी शक्ती हा विभाग हाताळत असल्याचा टोला त्यांनी लगावला. मंत्री झिरवाळ हे अत्यंत साधे गृहस्थ आहेत, मात्र त्यांच्यावर सध्या प्रचंड दबाव आहे. इतका दबाव जर दुसऱ्या कोणावर असता तर त्यांनी कधीच राजीनामा दिला असता, असे सांगत आव्हाड यांनी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित केले.
आश्रमशाळांमध्ये पुरवल्या जाणाऱ्या तांदळातही मोठी भेसळ होत असून तुकाराम मुंढे यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी ही भेसळ रोखण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
( नक्की वाचा : Pune News: केतन अग्रवाल हत्याकांडावर आरोपी चेतन चौधरीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया; प्रकरणाला वेगळंच वळण )
मुंढे यांच्या जीवाला धोका
सभागृहात हा विषय निघाल्यानंतर आमदार अर्जुन खोतकर यांनीही यात उडी घेतली. तुकाराम मुंढे यांना सध्या जीवे मारण्याच्या धमक्या येत असून त्यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे, त्यामुळे शासनाने त्यांना तात्काळ चोख सुरक्षा व्यवस्था पुरवावी, अशी मागणी खोतकर यांनी केली. दुसरीकडे भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले. तुकाराम मुंढे यांच्या नावातील टी म्हणजे टायगरमधील टी आहे, असे म्हणत ते अतिशय उत्तम काम करत असल्याने त्यांना किमान 3 वर्षे याच पदावर ठेवले पाहिजे, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी मांडली.
बदलीचा प्रश्नच येत नाही, मंत्र्यांचे स्पष्टीकरण
सभागृहातील या वादळानंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सरकारची बाजू मांडली. आयुक्त तुकाराम मुंढे सध्या एफडीएच्या माध्यमातून अतिशय चांगली आणि धडक कारवाई करत आहेत, त्यामुळे त्यांच्या बदलीचा सध्यातरी कोणताही प्रश्नच येत नाही, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली. या विभागाची अवस्था सध्या बिकट असून अधिकाऱ्यांना पुरेशा गाड्या आणि सुसज्ज कार्यालये नाहीत, ही वस्तुस्थिती त्यांनी मान्य केली. येत्या काळात विभागाला सक्षम करण्यासाठी आवश्यक गाड्यांची आणि इतर संसाधनांची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन झिरवाळ यांनी विधानसभेत दिले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world