राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांनी एक धाडसी विधान केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॅलेट पेपरद्वारे निवडणूक जिंकल्यास पुढील 20 वर्षे मी निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणी फहाद अहमद यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अणुशक्ती नगर मतदारसंघातून फहाद अहमद पराभूत झाले आहेत. पराभवानंतर फहाद अहमद यांनी मतदान यंत्रांच्या पडताळणीची विनंती करणाऱ्या फॉर्मचे छायाचित्र शेअर केले आहे.
फहाद अमहद यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, "आपल्या देशाच्या निवडणूक व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास जपण्यासाठी मी 2 CU/BU/VVPAT च्या पडताळणीसाठी विनंती अर्ज भरली आहे. निवडणूक आयोग एका बूथसाठी 47,200 इतकी मोठी रक्कम आकारत आहे. अन्यथा मी 13 बूथसाठी अर्ज केला असता."
एका यूजरच्या कमेंटला उत्तर देताना फहाद अहमदने म्हटलं की, "नरेंद्र मोदी यांना बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्यास सांगा. जर ते जिंकले तर मी 20 वर्षे निवडणूक लढवणार नाही."
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटाकडून लढलेल्या फहाद अहमद यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार सना मलिक यांनी पराभव केला. पराभवाचे अंतर 3,378 मतांचे होते. अहमद हे यापूर्वी अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षात युवा नेते होते. पण निवडणुकीपूर्वी त्यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला होता.