मुंबईत मध्यरात्री सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. रात्री 1 ते सकाळी 7 या सहा तासांत मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपलं. मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेनच्या वाहतुकीलाही याचा फटका बसला. पुढील 24 मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या दरम्यान काही भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुढील 24 तासात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघरमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे या दरम्यान समुद्राला भरती देखील येणार आहे. त्यामुळे जोरदार पाऊस झाला तर भरतीच्या वेळेला मुंबई तुंबण्याची शक्यता आहे. दुपारी 1 वाजून 57 मिनिटांनी समुद्राला भरती येणार आहे. यावेळी 4.40 मीटरच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. तर रात्री 8 वाजेच्या सुमारास ओहोटी येणार आहे.
(नक्की वाचा - मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; ठाणे ते CSMT लोकल सेवा ठप्प, प्रवाशांचे हाल)
पावसाची आकडेवारी
मागील 24 तासात मुंबईत 270 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मध्यरात्री 3 तासात 230 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कुलाब्यात देखील 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रुज हवामान केंद्राने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत मुंबईत 40.9 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर पहाटे 5.30 वाजेपर्यंत 210 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर सकाळी 8.30 वाजेपर्यंत 270 मिमी पावसाची नोंद झाली.
(नक्की वाचा - कोकणात मुसळधार! राजापूर शहराला पुराचा वेढा, सिंधुदुर्गातही पावसाची जोरदार बॅटींग)
मुसळधार पावसाचा वाहतुकीवर परिणाम
मुंबईतील मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. जोरदार पावसामुळे मुंबई विमानतळावरील काही पहाटेच्या फ्लाईट्स डायव्हर्ट करण्यात आल्या होत्या. नागपुरातून इंडिगोची फ्लाईट हैदराबादला डायव्हर्ट करण्यात आली होती.