रिक्षाचा चुराडा, मोबाइल सापडला, पण 12 तासानंतरही 'तो' बेपत्ता

करण हे रिक्षा चालक आहेत. होर्डिंग कोसळले त्याच वेळी ते तिथे गॅस भरण्यासाठी गेले होते. गॅस भरल्यानंतर त्यांची शिफ्ट संपणार होती आणि ते घरी जाणार होते.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

जुई जाधव 

घाटकोपरच्या छेडानगर येथे सोमवारी संध्याकाळी एक भलंमोठं होर्डिंग कोसळले. त्यात 14 जणांचा मृत्यू झाला तर 44 पेक्षा जास्त जण जखमी झालेत. तर काही जण अजूनही बेपत्ता आहेत. त्या पैकीत एक आहेत करण मौर्य... करण हे रिक्षा चालक आहेत. होर्डिंग कोसळले त्याच वेळी ते तिथे गॅस भरण्यासाठी गेले होते. गॅस भरल्यानंतर त्यांची शिफ्ट संपणार होती आणि ते घरी जाणार होते. तसे त्यांनी त्यांच्या सहकार्याला कळवले होते. पण त्यानंतर त्यांचा ना फोन आला ना त्यांचा काही पत्ता लागला. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय चिंतेत आहेत. शिवाय त्यांचा रिक्षा मालकही त्यांचा शोध घेत आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

करण मौर्य हे मुळचे उत्तर प्रदेशातील बदोहीचे रहिवाशी आहेत. मुंबईत ते अनेक वर्षापासून रिक्षा चालवतात. ते कुटुंबासह कामराजनगरमध्ये राहातात. सोमवारी नेहमी प्रमाणे ते रिक्षा चालवण्यासाठी बाहेर निघाले. संध्याकाळी लवकर घरी येतो असे त्यांनी सांगितले. संध्याकाळी पाच वाजता त्यांची शिफ्ट संपणार होती. त्याबाबत त्यांनी आपला दुसरा सहकारी विनोद गौर याला सांगितले होते. घाटकोपरच्या छेडानगरच्या पेट्रोल पंपावर गॅस भरल्यानंतर रिक्षा ते विनोदच्या हवाली करणार होते. तसे बोलणेही झाले. त्यानुसार विनोदही करणची वाट पाहात होते. पण करण यांचा काहीही फोन आला नाही. ज्या पेट्रोल पंपावर ते गॅस भरणार होते तिथेच दुर्घटना झाली. भले मोठे होर्डिंग खाली कोसळले होते. तिथे तर करण नसेल ना हा प्रश्न त्यांना सतावत होता. त्यानंतर विनोद आणि त्यांच्या रिक्षा मालकाने पेट्रोलपंप गाठले.  

Advertisement

हेही वाचा - घाटकोपर होर्डिंग कोसळल्याच्या घटनेत मृतांचा आकडा वाढला; 14 जणांचा मृत्यूला कोण जबाबदार?

या घटनेनंतर विनोद यांनी आपल्या रिक्षा मालकाला याची कल्पना दिली. त्यानंतर ते दोघेही तातडीने घटनास्थळी गेले. मात्र तिथे मोठ्या प्रमाणात धावपळ सुरू होती. काय सुरू आहे याची काही कल्पनाच येत नव्हती. मग या दोघांनीही राजावाडी हॉस्पिटल गाठलं. करण यांचा हॉस्पिटलमध्ये शोध घेतला गेला. पण तिथे ते सापडले नाही. संपुर्ण रात्रीतही त्यांची काही खबरबात मिळाली नाही. जिथे ही दुर्घटना झाली तेथे तो ढिगाऱ्याखाली दबला तर नसेल ना याचाही त्यांनी शोध घेतला. पण त्यांच्या हाती काहीच लागले नाही.  

Advertisement

हेही वाचा - वळिवाच्या पावसानंतर नागरिकांना मान्सूनचे वेध; अंदमानात कधी दाखल होणार मोसमी वारे?

सकाळ झाली. या दोघांनीही पुन्हा घटनास्थळ गाठलं. तिथे त्यांना त्यांची रिक्षा दिसली. रिक्षाचा पुर्ण चक्काचूर झाला होता. त्याच वेळी त्यांनी करणच्या फोनवर फोन लावला. फोनची रिंग वाजली. फोन त्यांनी बाहेर काढला. रिक्षा होती, फोनही भेटला पण करण काही तिथे नव्हता. त्यामुळे त्या दोघांच्याही चिंतेत भर पडली. काही जखमींना राजावाडी प्रमाणेच सायन रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यामुळे ते आता सायन रुग्णालयात जाऊन चौकशी करणार आहेत.          

Advertisement

हेही वाचा - डुकराच्या किडनीवर जगणाऱ्या व्यक्तीचा 2 महिन्यात मृत्यू; प्राण्यांचे अवयव वापरण्याची का आली वेळ?     

मुंबईत सोमवारी सायंकाळी अवकाळी पाऊस, तुफान वाऱ्याने झोडपून काढलं. तुफान वाऱ्यासह धुळीचे लोटही पसरले होते. यावेळी घाटकोपरच्या छेडा नगर येथील महाकाय होर्डिंग मागे असलेल्या पेट्रोल पंपावर कोसळलं. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 44 जण जखमी झाले आहेत.